बांगलादेशच्या धर्तीवर सत्ता पाडण्याच्या विधानांवरून लखनौ येथे पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्र्यांचा संताप
नवी दिल्ली:
Rajnath Singh on Regime Change या मुद्यावर बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नेहा बोरा आणि प्रशांत भूषण यांनी राजवट बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार हल्ला चढवला आहे. एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडी आणि सीजेपीकडून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय संघर्ष आणि अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
‘ते डंके की चोट पर सरकार पाडण्याबद्दल बोलतात’
लखनौ येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना राजनाथ सिंह यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, "ते बांगलादेशच्या धर्तीवर सत्तापालटाबद्दल बोलतात. ते पत्रकार परिषदांमध्ये हे सांगत आहेत. ते डंके की चोट पर सरकार पाडण्याबद्दल बोलतात. लोकशाही संस्था नष्ट करणे आणि देशाला आग लावणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे." वकील प्रशांत भूषण आणि आयसा अध्यक्षा नेहा बोरा यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांनी हा संताप व्यक्त केला.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, "’सत्तापालट’ यांसारख्या शब्दांच्या वापरावरून हे स्पष्ट होते की, त्यांचा लढा निवडणूक सुधारणांसाठी नाही, तो एसआयआरसाठी नाही, किंवा ज्ञानेश कुमार यांच्यासाठी नाही आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही नाही. उलट, देशात अराजकता निर्माण करून सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न आहे." राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की लोकशाही म्हणजे अराजकता पसरवण्याचा परवाना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींना मोलाचा सल्ला आणि संवादाचा मार्ग
यावेळी राहुल गांधींना सल्ला देताना राजनाथ सिंह म्हणाले की, लोकशाहीच्या रक्षणाच्या नावाखाली विघटनकारी राजकारण करण्याऐवजी त्यांनी जनमताचा आदर राखून आपल्या राजकीय भूमिकेवर आत्मपरीक्षण करावे. भारताच्या भविष्यासाठी प्रत्येकजण जबाबदार असून आपण संघर्षाचा नव्हे, तर संवाद आणि राष्ट्र उभारणीचा मार्ग निवडला पाहिजे.
काँग्रेसच्या इतिहासावर बोट; १९९३ मधील बदलांची आठवण
राजनाथ सिंह यांनी यावेळी इतिहासाची आठवण करून देत काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, "१९९३ मध्ये काँग्रेस सरकारने अचानक निवडणूक आयोगात बदल केले आणि रातोरात दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना पदावरून हटवण्याची शिफारस राष्ट्रपतींना केली होती, कारण चावला यांनी संवेदनशील माहिती काँग्रेस नेत्यांना दिल्याचा गंभीर आरोप होता."
काँग्रेसने केवळ नवीन चावला यांचे संरक्षण केले नाही तर त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणूनही नियुक्त केले, असा दावा त्यांनी केला. तसेच, काँग्रेसने नियुक्त केलेले माजी निवडणूक आयुक्त एम. एस. गिल हे नंतर सरकारमध्ये दोनदा केंद्रीय मंत्री झाले, असे सांगत त्यांनी पाच दशके मतदार ओळखपत्रांशिवाय झालेल्या निवडणुकांचा मुद्दाही उपस्थित केला.













