गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांकडून हेरगिरीचा गंभीर आरोप; दिल्लीसह मुंबईतही आंदोलनाची हाक
नवी दिल्ली:
CJP ‘Lehra Do Tiranga’ Protest च्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. दिल्ली पोलीस ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके राहत असलेल्या झंडेवाला परिसरातील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यामुळे दिल्ली पोलीस अभिजीत दिपकेंना कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईपूर्वी मध्यरात्री अभिजीत दिपके यांनी एक व्हिडिओ शेअर करत, दिल्ली पोलीस आपल्या पाळतीवर असून आपल्याला कधीही अटक होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती.
अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप; साध्या वेशातील पोलिसांकडून पाठलाग
गुप्तचर यंत्रणा (IB) आणि दिल्ली पोलीस आपल्यावर हेरगिरी करत असून पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आयबी आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी आपला पाठलाग करत असल्याचा दावा केला. आपण जेव्हा बाहेर पडतो, तेव्हा नंबर प्लेट नसलेली संशयास्पद वाहने आणि साध्या वेशातील पोलीस आपल्या मागे असतात, असे सांगत त्यांनी आपल्याला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली.

दिल्लीत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक; परिसरात कडेकोट निर्बंध
सीजेपीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेविरोधात CJP पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. दिल्लीमध्ये आज ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक देण्यात आली असून, संध्याकाळी ५ वाजता कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा रॅलीसाठी जमण्याचे आवाहन सीजेपीने केले आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॅनॉट प्लेस आणि आजूबाजूच्या परिसरात प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी सरकार संपूर्ण दिल्ली ठप्प करत आहे, असा घणाघाती आरोप यावेळी सीजेपीने केला.
*
सौरव दास व आशुतोष रांका तिहार जेलमध्ये; जंतरमंतरवरील घडामोडी*
काही दिवसांपूर्वी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर रांका आणि दास यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजी आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांनी जंतरमंतरमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आंदोलनांसाठी ठरवून दिलेल्या नियोजित स्थळांमधून जंतरमंतरचे नाव वगळण्यात आल्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी एका वर्षाचा बाँड लिहून घेतल्यानंतर अजिंक्य शिंदेंना सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील आझाद मैदानावरही तिरंगा रॅली सुरू
दिल्लीसह आता मुंबईतही या आंदोलनाचे उमटले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली आहे. आझाद मैदान हे निदर्शनांसाठी व आंदोलनांसाठी निश्चित केलेले हक्क असल्यामुळे सीजेपीला एकदिवसीय तिरंगा मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या रॅलीमध्ये सीजेपीचे अनेक समर्थक हातात तिरंगा झेंडा घेऊन सहभागी झाले आहेत.













