भात झोडणी सुरू असताना घडला प्रकार; राजापूर पोलीस ठाण्यात नुकसान केल्याप्रकरणी नोंद
राजापूर : राजापूर तालुक्यातील मौजे कोंड्ये तर्फे सौंदळ येथे पिकलेल्या भातशेतीमध्ये मोकाट गाय सोडून पिकाचे मोठे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतीचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत राजापूर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दावणीला न बांधता सोडली मोकाट गाय :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती शुभांगी तुकाराम शिवगण (वय ६१ वर्षे, रा. मधलीवाडी, कोंड्ये तर्फे सौंदळ, ता. राजापूर) या बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास जुने गावठाण येथील गट क्रमांक ६८ मधील आपल्या शेतात भात झोडणीचे काम करत होत्या. याच दरम्यान, गावातील संशयित आरोपी किशोर गणपत शिवगण (वय ५० वर्षे, रा. मधलीवाडी, कोंड्ये तर्फे सौंदळ) याने आपल्या मालकीची गाय दावणीला न बांधता तसेच तिच्या देखभालीसाठी किंवा राखणीसाठी कोणताही माणूस न ठेवता बेफिकीरपणे मोकाट सोडून दिली.

पिकलेल्या भातपिकाची नासाडी :
मोकाट सुटलेल्या गायीने थेट फिर्यादी यांच्या शेतात घुसून तेथील उभ्या आणि कापून ठेवलेल्या पिकलेल्या भातशेतीची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत पिकाचे नुकसान केले. हाता तोंडाशी आलेला घास जनावरांच्या बेजबाबदार वावरामुळे नष्ट झाल्याने फिर्यादी यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
राजापूर पोलिसांत गुन्हा नोंद :
याप्रकरणी शुभांगी शिवगण यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात संशयित किशोर गणपत शिवगण याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२४ (जुने भादंवि कलम ४२७ – नुकसान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.













