वालोपे गणेशवाडीतील एकावर गुन्हा दाखल; सुमारे ४ हजार लिटर गूळ-नवसागर मिश्रित रसायन नष्ट
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मौजे वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्टी नदीकिनारी झाडीझुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टीवर चिपळूण पोलिसांनी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टीची दारू, उकळते रसायन आणि गूळ-नवसागर मिश्रित हजारो लिटर कुजके रसायन असा एकूण १ लाख ४८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नदीकिनारी झाडीत सुरू होती हातभट्टी :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वालोपे गणेशवाडी येथील वाशिष्टी नदीच्या काठावर दाट झाडीझुडपांचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर गावठी दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद सहदेव आंबेरकर (ब.नं. ३६८) व त्यांच्या पथकाने गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०५ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी अचानक छापा टाकला. त्यावेळी संशयित आरोपी सूरज मधुकर चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. वालोपे गणेशवाडी, ता. चिपळूण) हा गैरकायदेशीररीत्या हातभट्टी लावून गावठी दारू गाळताना रंगेहात मिळून आला.

१ लाख ४८ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त :
छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून दारू गाळण्याचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर रसायन जप्त केले. यामध्ये प्रामुख्याने खालील साहित्याचा समावेश आहे:
२०० लिटर क्षमतेचे पत्र्याचे पिंप, ज्यामध्ये १५० लिटर उकळते रसायन होते (किंमत रु. ५,७५०/-)
प्लास्टिकच्या ५०० लिटर क्षमतेच्या २ काळ्या टाक्या (१००० लिटर रसायन) तसेच पत्र्याची ३ व प्लास्टिकचे १ बॅरल (८०० लिटर रसायन) (एकूण किंमत रु. ६७,०००/-)
२५ लिटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली २१ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू (किंमत रु. २,२००/-)
५०० लिटर मापाची ४ प्लास्टिक बॅरल्स, ज्यामध्ये तब्बल २००० लिटर गूळ-नवसागर मिश्रित सडलेले कुजके रसायन साठवलेले होते (किंमत रु. ७४,०००/-)
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल :
पोलिसांनी एकूण १ लाख ४८ हजार ९५० रुपयांचे हजारो लिटर घातक कुजके रसायन जागीच नष्ट केले असून, हातभट्टीचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सूरज चव्हाण याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२०/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ब), (क), (ड), (फ), (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.













