नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) रत्नागिरी जिल्हा शाखेचा उपक्रम; पांढऱ्या काठीच्या महत्त्वाबद्दल जनजागृती
चिपळूण :
White Cane Day Chiplun उपक्रमांतर्गत जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने आज चिपळूण शहरात विशेष जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून दृष्टिबाधितांच्या दैनंदिन आयुष्यातील पांढऱ्या काठीचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
विजापूर-गुहागर रस्त्यावर दृष्टिबाधितांचे प्रात्यक्षिक
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील गजबजलेल्या विजापूर-गुहागर रस्त्यावर दृष्टिबाधित बांधव-भगिनींनी पांढऱ्या काठीच्या साहाय्याने सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. दृष्टिबाधितांच्या जीवनात पांढऱ्या काठीचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणींबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे हा या आयोजनाचा मुख्य हेतू होता.

स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गक्रमणाचे प्रतीक
पांढरी काठी ही दृष्टिबाधित व्यक्तींना स्वतंत्रपणे चालताना मार्गातील अडथळे ओळखण्यास आणि कोणाच्याही मदतीशिवाय सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यास कशी मदत करते, याचा प्रभावी संदेश या प्रत्यक्ष सादरीकरणातून नागरिकांना देण्यात आला.
नॅब आणि लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या जनजागृती कार्यक्रमाला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) आणि स्थानिक सामाजिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये नॅबचे अध्यक्ष नीलेश भुरण, सेक्रेटरी भरत नांदगावकर, अमिता टिकेकर, खजिनदार नयन साडविलकर, ॲड. विवेक रेळेकर आणि प्रकाश पाथरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय लायन्स क्लब गॅलेक्सीच्या अध्यक्षा विद्या रेळेकर, लायन्स क्लब युनिटीच्या अध्यक्षा प्रणिता कपडेकर आणि बहुसंख्येने दृष्टिबाधित बांधव-भगिनी या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाले होते.













