School Admission Age Limit Maharashtra: पूर्व-प्राथमिक व पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

School Admission Age Limit Maharashtra: पूर्व-प्राथमिक व पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

३० जून ही वयोमर्यादेसाठी कट-ऑफ डेट; राज्य शासनाकडून शासन निर्णय (GR) जारी

मुंबई :

School Admission Age Limit Maharashtra संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार पूर्व-प्राथमिक (प्री-प्रायमरी) ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. संबंधित शैक्षणिक वर्षात हे वय ३० जून रोजी पूर्ण असणे बंधनकारक असेल. हे नवीन निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहेत.

टप्प्याटप्प्याने अशी असेल नवीन वयोमर्यादा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP 2020) मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने हे निकष ठरवले आहेत. विविध वर्गांसाठीची वयोमर्यादा आणि ती लागू होणारे वर्ष खालीलप्रमाणे आहे:

Tata motars tiago

बालवाटिका-१ (नर्सरी): प्रवेशासाठी ३ वर्षे पूर्ण असणे आवश्यक (शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून).

बालवाटिका-२ (ज्युनिअर के.जी.): प्रवेशासाठी ४ वर्षे पूर्ण असणे आवश्यक (शैक्षणिक वर्ष २०२८-२९ पासून).

बालवाटिका-३ (सिनिअर के.जी.): प्रवेशासाठी ५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक (शैक्षणिक वर्ष २०२९-३० पासून).

इयत्ता पहिली: प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक (शैक्षणिक वर्ष २०३०-३१ पासून).

सर्व बोर्डांच्या शाळांसाठी एकसमान नियम
यापूर्वी राज्यात राज्य मंडळ (State Board), सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आयबी (IB) बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या दिनांकांनुसार वयोमर्यादा ग्राह्य धरली जात होती. तसेच पूर्व-प्राथमिक वर्गांसाठी निश्चित वयाची अट नव्हती. केंद्र शासनाने पहिलीच्या प्रवेशासाठी बालकाचे वय ६ वर्षांपेक्षा अधिक असावे असे निर्देश दिल्यानंतर राज्य शासनाने हा एकसमान नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यमान विद्यार्थ्यांना वयोमर्यादेच्या अटीतून सूट
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यमान विद्यार्थ्यांना हे नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांनाही या निकषांतून सूट देण्यात आली आहे.

१५ दिवसांची शिथिलता आणि पुढील मार्गदर्शक सूचना
पूर्व-प्राथमिक वर्गातील (नर्सरी ते पहिली) प्रवेशासाठी शाळाप्रमुखांच्या (प्राचार्य/मुख्याध्यापक) स्तरावर किमान आणि कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट/शिथिलता देता येऊ शकेल. पायाभूत वर्गांतील नामांकनासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सूचनांचे पालन करावे लागणार आहे. या नवीन वयोमर्यादेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून लवकरच प्रसिद्ध केल्या जातील.