Aare Ware Beach Action: रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनारी वनविभागाची अचानक धडक कारवाई; २० ते २१ तात्पुरते स्टॉल्स उद्ध्वस्त

Aare Ware Beach Action: रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनारी वनविभागाची अचानक धडक कारवाई; २० ते २१ तात्पुरते स्टॉल्स उद्ध्वस्त

पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने कारवाई; स्थानिक व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान, पूर्वकल्पना न दिल्याने तीव्र नाराजी

Aare Ware Beach Action मुळे रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारपट्टीवर स्थानिक व्यावसायिक आणि वनविभाग यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे सागरी मार्गावर आरे-वारे पुलाजवळ असलेल्या प्रसिद्ध किनाऱ्यावर स्थानिक ग्रामस्थांनी उभारलेल्या सुमारे २० ते २१ तात्पुरत्या स्टॉल्सवर वनविभागाने अचानक बुलडोझर आणि जेसीबी चालवून कारवाई केली. ऐन पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर ही धडक मोहीम राबवण्यात आल्याने स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Aare Ware Beach Action दरम्यान स्थानिकांना साहित्य हलवण्याची संधीही नाही
रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे किनारा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने गेल्या काही वर्षांत येथे पर्यटकांची मोठी गर्दी वाढली होती. स्थानिकांनी या संधीचा फायदा घेत चहा-वडापाव, नारळपाणी, कोकणी नाश्ता आणि समुद्रात भिजणाऱ्या पर्यटकांसाठी आंघोळीची व्यवस्था करणारे स्टॉल्स उभारले होते. रस्त्याच्या दुतर्फा वाळूच्या भागात स्टॉल्सला मजबुती देण्यासाठी काहींनी चिरे आणि मातीचा भराव टाकून ओटे बांधले होते. मात्र, वनविभागाने दोन दिवस मोठ्या फौजफाट्यासह ही कारवाई सुरू ठेवून सर्व ओटे व कठडे उद्ध्वस्त केले. काही लहान व्यावसायिकांना आपले साहित्य हलवण्याची साधी संधीही मिळाली नाही.

आरे-वारे समुद्रकिनारी ट्री हाऊस प्रकल्प आणि निनावी तक्रारीची पार्श्वभूमी
सध्या आरे-वारे येथील सुरू बनात वनविभागाच्या ट्री हाऊस प्रकल्पाचे काम सुरू आहे. स्थानिक व्यावसायिकांना दिलेल्या माहितीनुसार, आपापसातील वादातून काहींनी वनविभागाकडे निनावी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वनविभागाने कोणतीही पूर्वकल्पना किंवा पूर्वसूचना न देता ही अचानक कारवाई केली. या कारवाईमुळे विधवा महिला, स्थानिक तरुण आणि गरीब कुटुंबांच्या रोजगाराचे साधन एकाकी हिरावले गेले आहे.

Ratnagiri Khabardar add image

स्थानिक व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका
या धडक कारवाईवर वनविभाग आणि स्थानिक व्यावसायिकांनी आपापली बाजू मांडली आहे:

"आरे-वारे समुद्रकिनारी वनविभागाच्या हद्दीत असलेल्या या झोपड्यांचे स्ट्रक्चर आणि ओटे दगडी बांधकामाने कायमस्वरूपी (परमनंट) केले जात असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे या सर्व झोपड्या काढून टाकण्यात आल्या."

— विक्रम गुरव (वनक्षेत्रपाल, रत्नागिरी)

"गेली काही वर्षे आमचे व्यवसाय येथे सुरू आहेत. वनविभागाने कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कारवाई सुरू केली. यात अनेक गरीब महिलांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. वन अधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत योग्य माहिती दिली जात नव्हती. ऐन पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला ही कारवाई झाल्याने आता आम्ही व्यवसाय कसा करायचा?"

— वैभव वाडकर (बाधित स्टॉलधारक, आरे-वारे बीच)

दुर्घटनेच्या वेळी मदतीला धावणारे स्थानिक संकटात
आरे-वारे किनाऱ्यावर अचानक दुर्घटना घडल्यास हेच स्थानिक स्टॉलधारक पर्यटकांच्या मदतीसाठी नेहमी धावून जात असत. मात्र, प्रशासनाकडून सहकार्याऐवजी रोजगारावरच गदा आणल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत वैभव वाडकर, शामल पारकर, अर्चना मयेकर, दीपाली मयेकर, नवज्योत मयेकर, संदीप मयेकर, वैभव मयेकर, रवी शिवलकर, रवी पारकर, उल्का बनप, विलास चौगुले, शीतल शिवलकर, आशिष कनगुटकर, अजय बिर्जे, रणजितसिंग मालगुंडकर, अमोल घाग, वैभव प्रकाश मयेकर, नरेश मयेकर, संगीता मयेकर, साहिल मयेकर आणि प्रीती मयेकर या सर्व व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.