पोलिसांच्या कारवाईवर नेहा बोरा यांचा तीव्र आक्षेप; मध्य दिल्लीतील दडपशाही आणि नियमांच्या उल्लंघनाचा केला आरोप
Delhi Protest Action संदर्भात दिल्ली पोलिसांकडून शनिवारी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या (AISA) अध्यक्ष नेहा बोरा यांची आज पहाटे सुटका करण्यात आली आहे. तर या आंदोलनाप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सूर्यास्तानंतरच्या कारवाईवर नेहा बोरा यांचा तीव्र आक्षेप
सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना नेहा बोरा यांनी प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या कारवाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून सर्वसामान्य नागरिकांना सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः महिलांना सूर्यास्तानंतर ताब्यात ठेवता येत नाही आणि सोडायचे असल्यास ते नियमांनुसार केले पाहिजे, मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्य दिल्लीतील परिस्थिती आणि महाभियोगाची मागणी
मध्य दिल्लीत निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांना रस्ते बंद असल्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे बोरा यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग चालवून ‘एसआयआर’ तात्काळ रोखण्यात यावे, जेणेकरून नागरिकांचा मतदानाचा हक्क आणि शांतता अबाधित राहील, अशी आक्रमक मागणीही केली.

वकिलांशी संपर्क साधू न दिल्याचा पोलिसांवर आरोप
पोलिसांच्या वर्तनावर ताशेरे ओढताना बोरा म्हणाल्या की, पोलिसांनी नाव आणि पत्त्याची विचारपूस केली, परंतु बराच वेळ वकील किंवा सहकाऱ्यांशी संपर्क साधू दिला नाही. सुमारे ५ ते ६ तास वकिलांनी सतत प्रयत्न केल्यानंतर कुठे भेटीची परवानगी देण्यात आली. पोलिसांची ही दडपशाहीची भूमिका नवी नसून ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.













