संविधानामुळेच देशात लोकशाही आणि संसद सर्वोच्च; मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट उच्चार
Smart Nagrik Book Launch कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकशास्त्र आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित ‘स्मार्ट नागरिक’ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा’ या विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले आहे. ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत (स्मार्ट नागरिक)’ या उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या पुस्तिका विशेष Endorsment द्वारे तयार करण्यात आल्या आहेत. या प्रकाशन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान अस्तित्वात आहे, तोपर्यंत देशाचे सर्व महत्त्वाचे निर्णय संसदेतच घेतले जातील, असा स्पष्ट संदेश दिला. तसेच सत्ता किंवा राजवट ही नेहमी निवडणुकीच्या माध्यमातूनच बदलेल, असेही त्यांनी नमूद केले.
संविधानामुळेच देशात लोकशाही आणि संसद सर्वोच्च
या कार्यक्रमात आपल्या मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा भारत देश आहे; येथे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका किंवा नेपाळसारखी परिस्थिती कधीच निर्माण होऊ शकत नाही, कारण या शेजारील देशांकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाही. जोपर्यंत आपले संविधान सुरक्षित आणि मजबूत आहे, तोपर्यंत देशात संसदच अंतिम निर्णय घेईल, एवढी अफाट ताकद या संविधानात सामावलेली आहे. गेल्या काही वर्षांत अनेकांकडून संविधानावर आणि लोकशाहीवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले, परंतु हे संविधान इतके भक्कम आहे की भारताच्या लोकशाहीला कोणीही आजवर धक्का लावू शकलेले नाही.
ज्या लोकांच्या मनात भारत ही पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंकेसारखी बिकट स्थिती निर्माण करण्याचे मनसुबे आहेत, त्यांनी हा इतिहास आणि वास्तव लक्षात ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. या देशात प्रत्येक नागरिकाला संविधानाने न्याय मिळवण्याचा अधिकार दिला असून, नेहमी संवैधानिक मार्गाचा अवलंब करूनच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करावा. जर कोणी असंवैधानिक मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे काय करायचे हेदेखील संविधानाने आधीच ठरवून स्पष्ट केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संविधान हे संधीची समानता आणणारे महान कागदपत्र
‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांमधून विद्यार्थी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन एक आदर्श ‘स्मार्ट नागरिक’ बनतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारताचे वर्तमान संविधान आजच नव्हे तर पुढील ३०० वर्षांनंतरही तितकेच सुसंगत आणि रिलेव्हन्ट (Relevant) राहणार आहे, कारण संविधानाने दिलेली मूल्ये ही कालजयी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील विविध देशांच्या संविधानांचा सखोल अभ्यास करून, देशातील सामाजिक मूल्यांचा विचार करत आणि प्रचंड संघर्ष व संवेदनशीलतेतून हे सुंदर संविधान निर्माण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संविधानाला सर्वोच्च स्थान दिले असून गीता, बायबल किंवा कुराण या ग्रंथांपेक्षाही देशाचे संविधान सर्वात महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. आपला देश ऐतिहासिक काळात एक हजार वर्षे गुलामीत राहिला, कारण आपण आपल्या समाजाची मूलभूत तत्त्वे विसरलो होतो आणि समाजात असमानता निर्माण करून आपण स्वतःच गुलामगिरीकडे चाललो होतो. मात्र, बाबासाहेबांच्या संविधानाने समाजात खरी समता प्रस्थापित करून दाखवली. हे संविधान केवळ नियमांचे कागदपत्र नसून ते देशातील प्रत्येक घटकाला ‘संधीची समानता’ मिळवून देते. एवढ्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात जाती-पाती, धर्म आणि विविध भागांतील लोकांना एका सूत्रात कसे बांधून ठेवावे, याचे उत्तम मार्गदर्शन संविधानानेच केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.













