चिपळूण : कुंभार्ली घाटरस्त्यातील खड्ड्यातूनच प्रवास

चिपळूण : दिवाळी संपली, पावसानेही पाठ फिरवली तरी कुंभार्ली घाटातील रस्ते दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आलेले नाही. घाटरस्त्याची अवस्था पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिपळूण दौऱ्यात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही रस्ता दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मग्न असल्यामुळे घाटातील रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहनचालकांना खड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. ब्रिटिशनकालीन रस्ता बरा होता, असे म्हणण्याची वेळ आता प्रवाशांवर आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट हा चिपळूण-कराड मार्गावर येतो.

सुमारे बारा किलोमीटरचा हा घाटमार्ग खड्ड्यांमुळे धोकादायक झाला आहे.

चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जाते. पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. ते खड्डे आजही कायम आहेत. मातीने खड्डे भरण्याची तसदीसुद्धा कुणी घेतली नाही. अवघड वळणावर रस्त्यावरील डांवर वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी फक्त रस्त्यावर खडी दिसत आहे तर काही ठिकाणी खोल खड्डे स्पष्ट दिसत आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळतात, पंक्चर होतात. एखादे वाहन रस्त्याच्या मध्यभागी बंद पडले तर तासनतास वाहतूककोंडी होते. त्यामुळे मोठ्या अवजड वाहनांना या घाटातून प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे.

पर्यटनावर परिणाम
पुणेसह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटक दिवाळीनंतर कुंभार्ली घाटमार्गे कोकणात दाखल होतात. घाटरस्त्याची अवस्था पाहून पर्यटक कुंभार्ली घाटमार्गे कोकणात येण्यास तयार नाहीत. त्याचा परिणाम चिपळूणसह परिसरातील तालुक्याच्या पर्यटकांवर होणार आहे.

कुंभार्ली घाटातून प्रत्येक आठवड्याला प्रवास करतो. रस्त्याची इतकी वाईट अवस्था कधीच झालेली नव्हती. काही दिवसांपूर्वी एक ट्रक खड्डयात अडकला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ब्रिटिशकालीन रस्ते बरे होते. असे म्हणण्याची वेळ आली आहे. पराग वडके, प्रवासी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 09/Nov/2024