सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यासाठी मोर्चा काढल्याचा भाजप नेत्याचा आरोप
Brij Bhushan Singh Elon Musk Claim मुळे देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंजचे माजी खासदार आणि भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी सीजेपीच्या (CJP) ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनावर जोरदार निशाणा साधला आहे. नवी दिल्लीत काढण्यात आलेल्या या मार्चला अमेरिकन अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क जबाबदार असल्याचा अत्यंत धक्कादायक दावा बृजभूषण शरण सिंह यांनी केला आहे. हे आंदोलन म्हणजे देशाविरोधात आखलेले एक मोठे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बृजभूषण शरण सिंह यांचे गंभीर आरोप
बृजभूषण शरण सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सीजेपीचे हे आंदोलन एलॉन मस्क यांच्या इशाऱ्यावर चालवले जात आहे. परदेशी उद्योजकांना त्यांच्या अटींवर भारतात व्यवसाय करायचा आहे आणि तेच लोक या आंदोलनाला मागून ताकद पुरवत आहेत. देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाला धमकावण्यासाठी असा मोर्चा काढला गेला आहे, जे यापूर्वी भारताच्या इतिहासात कधीही घडले नव्हते. आता आपल्या देशाची तुलना बांगलादेश आणि पाकिस्तानसोबत केली जात असल्याचे सांगत त्यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला.
आंदोलक नेते अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात
दुसरीकडे, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी आधीच अभिजीत दीपके यांना नोटीस जारी करून कनॉट प्लेस येथील ‘सेंट्रल पार्क’वर आंदोलन न करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अभिजीत दीपके घरातून एकटे आंदोलनासाठी निघाले असता, दिल्ली पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले.

दिल्ली उच्च न्यायालयाची सुनावणी आणि रस्त्यांवर आंदोलकांची गर्दी
अभिजीत दीपके यांच्या ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या आंदोलनाला थेट परवानगी नाकारण्यास नकार दिला होता. यानंतर NDMC कडून प्रशासकीय कारणास्तव १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सेंट्रल पार्क पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी मुख्य नेत्यांना ताब्यात घेतले तरीसुद्धा, मोठ्या संख्येने आंदोलक आणि नागरिक नवी दिल्लीतील प्रमुख रस्त्यांवर उतरल्याचे पाहायला मिळाले.













