९ प्रमुख परीक्षांमधील गैरप्रकारांची होणार सखोल चौकशी
MPSC Inquiry Commission प्रकरणाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली असून, त्याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या उच्चस्तरीय चौकशी आयोगाचे अध्यक्षपद मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या आयोगामध्ये निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह एकूण पाच सदस्यांचा समावेश असून, यामध्ये प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचा समावेश आहे. हा आयोग अधिसूचना जारी झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत आपला सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार आहे.
एकूण ९ परीक्षांतील गैरप्रकारांची होणार चौकशी
या चौकशी आयोगाच्या माध्यमातून MPSC च्या एकूण ९ महत्त्वाच्या परीक्षांमधील गैरप्रकारांची कसून चौकशी केली जाणार आहे. यामध्ये अन्न व औषध निरीक्षक, महाराष्ट्र गट-ब, गट-क, कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा यांसारख्या परीक्षांचा समावेश आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका किंवा तिचा काही भाग फुटल्याच्या सर्व आरोपांची या माध्यमातून तपासणी होईल. विशेष म्हणजे, MPSC चे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसेच सदस्यांच्या भूमिकेचीही यादरम्यान तपासणी केली जाणार असून, दोष सिद्ध झाल्यास भारतीय संविधानाच्या कलम ३१७ अंतर्गत कायदेशीर कारवाई शिफारस करण्याची जबाबदारी या आयोगावर असणार आहे. तसेच पेपरफुटीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी आणि इतर संशयित व्यक्तींच्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल.

सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार
MPSC परीक्षांमधील पेपरफुटीच्या मुद्यावर विद्यार्थ्यांनी आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुण्यात सलग १० दिवस तीव्र आंदोलन केले होते. राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.
विवेक भीमनवार रजेवर गेल्यामुळे त्यांच्या या रजेच्या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यावतीने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत.













