स्पा आणि सलूनसाठीच्या बेकायदेशीर बांधकामावर ‘के-वेस्ट’ विभागाची कारवाई; रहिवाशांचा व्यावसायिक वापराला तीव्र विरोध
BMC Action At Ajay Devgn Bungalow प्रकरणात मुंबईच्या जुहू परिसरातील बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अजय देवगणच्या या बंगल्याच्या आवारात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर मुंबई महानगरपालिकेने (BMC) हातोडा चालवला आहे. आवश्यक परवानग्या न घेता करण्यात येत असलेल्या स्पा आणि सलून सेंटरच्या बांधकामावर पालिकेच्या ‘के-वेस्ट’ विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.
‘काम थांबवा’ नोटीशीकडे दुर्लक्ष केल्याने बीएमसीची धडक कारवाई
बॉलिवूड स्टार अजय देवगणची ही मालमत्ता जुहू येथील नामांकित ‘कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मध्ये स्थित आहे. या बंगल्यात अंतर्गत बदल, विभाजनाच्या भिंती, खिडक्या आणि इतर कामांसाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या न घेतल्याचा गंभीर आरोप झाला होता. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने १० सप्टेंबर २०२६ रोजी एमएमसी (MMC) कायद्याच्या कलम ३५४A अंतर्गत नोटीस बजावली होती. पालिकेने काम तातडीने थांबवून आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, नोटीस दिल्यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्याने पालिकेने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन अनधिकृत बांधकामाचा काही भाग पाडून टाकला.
१०.६१ कोटींचा भाडेकरार आणि व्यावसायिक वापराला विरोध
अजय देवगणने हा बंगला ‘फ्लोरियन ह्युरेल सलून प्रायव्हेट लिमिटेड’ला पाच वर्षांच्या कालावधीसाठी तब्बल १०.६१ कोटी रुपयांच्या करारावर भाड्याने दिला आहे. येथे व्यावसायिक स्पा आणि सलून सेंटर सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, निवासी परिसरात व्यावसायिक वापर होणार असल्याने कपोल सोसायटीतील रहिवाशांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. स्पा आणि सलूनमुळे परिसरात लोकांची ये-जा वाढेल, गाड्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होईल, गोंगाट वाढून सुरक्षिततेचा धोका निर्माण होईल, अशी भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली होती.

अजय देवगणच्या टीमचा दावा आणि आगामी चित्रपट
अजय देवगणच्या टीमशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून प्रस्तावित कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित प्राधिकरणांकडून घेण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, या संपूर्ण वादावर खुद्द अजय देवगणकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
दरम्यान, अजय देवगण सध्या त्याच्या ‘दृश्यम ३’ (Drishyam 3) या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, चित्रपटाच्या यशासोबतच आता बंगल्यावरील पालिकेच्या या कारवाईमुळे तो भलताच चर्चेत आला आहे.













