‘अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले’; शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही, असा रोहित पवारांचा अल्टिमेटम
Rohit Pawar On BJP प्रकरणावरून सोलापूर दौऱ्यावर असताना आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या भूमिकेवर अत्यंत आक्रमक शब्दांत प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेले राज्याचे अर्थमंत्रीपद अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी करूनही हे पद मिळाले नसल्याचा संदर्भ देत, "सुनेत्रा पवार यांना कधीच अर्थमंत्री पद मिळणार नाही, मी भाजपला फार चांगल्या प्रकारे ओळखतो," असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
‘अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरले’
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याची अर्थखात्याची धुरा होती. मात्र, जानेवारी महिन्यात त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, अर्थसंकल्पाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडेच ठेवले. या घटनेला आता ९ महिने उलटून गेले तरी हे पद राष्ट्रवादीला परत देण्यात आलेले नाही.
यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, "अजित दादा गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरून घेतलेले आहे. अजित दादांना त्यांच्या पक्षातील आणि भाजपमधील दोघेही नेते न्याय देऊ शकले नाहीत," असा गंभीर आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या केवळ ५ हजार रुपयांच्या अग्रीम (Advance) मदत निधीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, "सरकारला माझा स्पष्ट अल्टिमेटम आहे की, शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि योग्य मदत करा, अन्यथा तुम्हाला राज्यात दिवाळी साजरी करू देणार नाही. केवळ पाच हजारांची मदत देऊन सरकार राज्यातील बळीराजाला गृहीत धरत आहे." या दौऱ्यानंतर आता आपण उद्यापासून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्णपणे सक्रिय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुकाराम मुंढेंवर पूर्ण विश्वास, MPSC चौकशीबाबत भाष्य
MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "आमचा प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. चौकशी समिती निष्पक्ष तपास करेल. अनेक विद्यार्थी आम्हाला भेटले असून ते तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांना पुरावे देतील, जेणेकरून लवकरात लवकर सत्य समोर येईल." या समितीत नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पार्श्वभूमी परीक्षण (Background Check) आम्ही केले असून त्यांच्याविषयी कोणतीही नकारात्मक माहिती समोर आलेली नाही. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.













