तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी दिली लग्नाच्या आमंत्रणाबाबत माहिती; २१ नोव्हेंबरला चेन्नईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन
Anirudh Ravichander Kavya Maran Wedding ची बातमी सध्या सिनेसृष्टीपासून ते क्रिकेटविश्वापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हा ‘इंडियन प्रीमियर लीग’ (IPL) मधील ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH) फ्रँचायझीची मालकीण काव्या मारन हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. आता त्यांच्या लग्नाची संभाव्य पत्रिका आणि कार्यक्रमाची माहिती समोर आली आहे.
ग्रीसमध्ये लग्न आणि चेन्नईत ग्रँड रिसेप्शन
मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन हे आगामी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये अत्यंत दिमाखात लग्न करणार आहेत. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईतील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये या जोडप्याचे भव्य रिसेप्शन पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी देशातील अनेक दिग्गज कलाकार, सेलिब्रिटी तसेच बड्या राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. जरी अनिरुद्ध किंवा काव्या यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी या चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सोशल मीडिया पोस्ट
या लग्नाच्या आमंत्रणाबाबत खुद्द तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन आणि त्यांच्या पत्नी कावेरी मारन यांनी जुबली हिल्स येथील माझ्या निवासस्थानी भेट घेऊन मुलगी काव्या मारन हिच्या विवाह रिसेप्शनसाठी निमंत्रण दिले. काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्न रिसेप्शनचे आयोजन २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये होणार आहे." याशिवाय तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसह अभिनेते विजय यांनाही लग्नाची पत्रिका पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांची पार्श्वभूमी
काव्या मारन: काव्या मारन ही ३३ वर्षांची असून ती ‘सन ग्रुप’चे अध्यक्ष कलानिधी मारन यांची कन्या आहे. ती आयपीएलमधील ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH) संघाची सह-मालकीण म्हणून देशभरात लोकप्रिय आहे.
अनिरुद्ध रविचंदर: अनिरुद्ध हा ३५ वर्षांचा असून तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. तो सुपरस्टार रजनीकांत यांचा नात्याने भाचा लागतो. त्याने आपल्या अप्रतिम संगीत दिग्दर्शनाने रजनीकांत, कमल हासन, थलपती विजय, ज्युनियर एनटीआर यांच्यासह शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना संगीत दिले आहे.
दरम्यान, अनिरुद्धने अलीकडेच संगीत दिलेला ‘जेलर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून, प्रदर्शनानंतर अल्पावधीतच चित्रपटाने जगभरात २०० कोटींहून अधिक कमाईचा टप्पा ओलांडला आहे.













