नाणार खाडी दुर्घटनेतील चिमुकल्यांच्या कुटुंबाला ६ लाखांचे सानुग्रह अनुदान; शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या तत्परतेने अवघ्या ६ दिवसांत प्रस्ताव

नाणार खाडी दुर्घटनेतील चिमुकल्यांच्या कुटुंबाला ६ लाखांचे सानुग्रह अनुदान; शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या तत्परतेने अवघ्या ६ दिवसांत प्रस्ताव

जिल्हाधिकारी मनूज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी; शिक्षण संचालकांकडे निधीची मागणी पाठवली

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार-इंगळवाडी येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी खाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चार निष्पाप शाळकरी भावंडांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक व सामाजिक दिलासा मिळाला आहे. ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने’अंतर्गत या कुटुंबाला प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण ६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग अवघ्या ६ दिवसांत मोकळा झाला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी दाखवलेल्या प्रशासकीय तत्परतेमुळे हे शक्य झाले आहे.

जिल्हा समितीची तातडीची बैठक; प्रस्तावाला मंजुरी :

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनूज जिंदल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ दावे निकाल समितीची विशेष सभा संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाणे आणि सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार उपस्थित होते. शासनाच्या २१ जून २०२२ च्या निकषानुसार हे सर्व प्रस्ताव परिपूर्ण असल्याचे पडताळून समितीने या चारही विद्यार्थ्यांच्या दाव्यांना तात्काळ मंजुरी दिली.

Tata altroz

चारही मृत विद्यार्थी नाणार शाळेचे :

११ ऑक्टोबर २०२६ रोजी आईसोबत खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेले असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात बुडून या चार भावंडांचा करुण अंत झाला होता. हे चारही विद्यार्थी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाणार (उर्दू) चे विद्यार्थी होते: १. मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे, इयत्ता पहिली) — मंजूर अनुदान: १,५०,०००/- २. जुवेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे, इयत्ता चौथी) — मंजूर अनुदान: १,५०,०००/- ३. बुशरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे, इयत्ता सहावी) — मंजूर अनुदान: १,५०,०००/- ४. माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे, इयत्ता दहावी) — मंजूर अनुदान: १,५०,०००/- या चारही विद्यार्थ्यांच्या आई श्रीम. हिना जुनेद भाटकर यांच्या बँक खात्यात एकूण ६,००,०००/- (सहा लाख रुपये) वर्ग करण्यासाठी जिल्हा समितीने मंजुरी दिली आहे.

शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव रवाना; लवकरच खात्यात जमा होणार रक्कम :

जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनूज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि शिक्षण सभापती नंदा मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पुणे येथील शिक्षण संचालनालयाकडे (योजना) अधिकृत प्रस्ताव पाठवला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी शिक्षण संचालकांशी थेट संपर्क साधून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत निधी तात्काळ वितरित करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शासनाकडून निधी प्राप्त होताच ही मदत थेट पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. दुर्घटनेनंतर केवळ सहा दिवसांच्या विक्रमी वेळेत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल प्रशासनाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.