Guardian Minister Uday Samant Ratnagiri Visit: रत्नागिरीत विकासाकामांमध्ये अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही; पालकमंत्री उदय सामंत यांचा कडक इशारा

Guardian Minister Uday Samant Ratnagiri Visit: रत्नागिरीत विकासाकामांमध्ये अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही; पालकमंत्री उदय सामंत यांचा कडक इशारा

जुन्या बाजारपेठेतील ३ कोटींच्या नवीन भाजी मंडईचे लोकार्पण; अग्निशमन दलाला १० मिनिटांच्या आत पोहोचण्याचे निर्देश

रत्नागिरी:

रत्नागिरी शहरात विकासकामे सुरू असताना कोणत्याही प्रकारची अस्वच्छता खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. स्वच्छतेच्या कामात कसूर किंवा गडबड झाल्यास "माझा पेन चालेल" (कडक कारवाई करेन), अशी तडाखाबंद भूमिका त्यांनी प्रशासनाला सुनावली आहे. रत्नागिरीच्या जुन्या बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे तीन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन भाजी मंडई इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव देण्याची सूचना
सुमारे ३ कोटी रुपये खर्चून स्वामी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उभारलेली ही नूतन भाजी मंडई अत्यंत देखणी असून, यात ११ व्यापारी गाळे आणि एक सुसज्ज सभागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिक पातळीवर ठराव करून या मंडईला ‘श्री नवलाई देवी भाजी मंडई’ असे नाव द्यावे, अशी सूचना केली. तसेच कंत्राटदार कंपनीने उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे गौरवोद्गार काढले.

Shree krushn shreekhand

स्वच्छतेबाबत तडजोड नको; पोलिसांकडे कारवाईची वेळ आणू नका
रत्नागिरी शहराचा विकास मोठ्या शहरांच्या धर्तीवर होत आहे. नगरपरिषदेची नूतन प्रशासकीय इमारत आणि विमानतळासह अनेक विकासकामे मार्गी लागत असताना शहरातील अस्वच्छता अजिबात शोभणारी नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

सफाई कर्मचाऱ्यांना मोकळीक: शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना पूर्ण मोकळीक द्यावी, तसेच त्यांना योग्य मानधन आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

कडक कारवाईचा इशारा: उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी नगरपरिषदेने पार पाडावी. ही कारवाई पोलिसांकडे सोपवण्याची वेळ येऊ देऊ नका, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला सज्जड दम भरला. हात जोडून शहर स्वच्छ ठेवण्याची विनंती करतानाच कचरा उचलण्यासाठी आवश्यक त्या गाड्या उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

अग्निशमन दल १० मिनिटांत पोहोचले पाहिजे
रत्नागिरी नगरपरिषद आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) परस्पर समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री म्हणाले की, आपत्तीबाबतचा फोन आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या आत अग्निशमन दलाची मदत घटनास्थळी पोहोचली पाहिजे.

—जेथे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नवीन भाजी मंडईसह शहरातील सुविधांचे जतन करण्याचे आवाहन केले, तर सभापती विजय खेडेकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. नगरसेविका सायली पाटील यांनी ‘नवलाई तलावाच्या’ सुशोभीकरणासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे, तसेच शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवतांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, सर्वांनी समन्वयाने विकासकामांची जबाबदारी वाटून घेऊन ती पूर्णत्वास न्यावीत. अशा प्रकारे कामे केल्यास निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतानाच विजयाची खात्री वाटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.