Ratnagiri Rain Update: रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस; कापणी केलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान

Ratnagiri Rain Update: रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मेघगर्जनेसह पाऊस; कापणी केलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान

हवामान विभागाकडून यलो अलर्ट; लांजा, खेड आणि संगमेश्वर तालुक्यांत जोरदार हजेरी

रत्नागिरी:
रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडल्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहरासह लांजा, खेड आणि संगमेश्वर या विविध तालुक्यांत झालेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी शेतात कापणी करून वाळत ठेवलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेली झेंडूची फुले भिजू नयेत यासाठी व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. हवामान विभागाने रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवर आगामी काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देत जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे.

खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

खेड तालुक्यात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आकाश ढगांनी व्यापून गेले होते आणि सोसाट्याचा वारा सुटला. दुपारी तीननंतर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या दरम्यान खेड तालुक्यातील भरणे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून तु. बा. कदम महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळले. यामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने ग्रामस्थ आणि जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

Arihant 1

संगमेश्वर आणि लांजा परिसरात हलका ते जोरदार पाऊस

संगमेश्वर तालुक्यातील माखजन, करजुवे, आरवली, तुळस, कुंभारखाणी आणि कडवई भागात दुपारी साडेतीननंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला तुफान पाऊस होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र सोसाट्याचा वारा सुटल्याने ढग पुढे सरकले आणि जमीन भिजेल इतका पाऊस झाला. लांजा आणि खेड तालुक्यांतही पावसाचा जोर अधिक होता. ऑक्टोबर हिटमुळे तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचले असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे.

कापणी केलेले भातपीक पाण्यात; शेतकरी चिंतातुर

यंदा जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने आधीच भातशेती संकटात सापडली होती आणि सहा तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्यातच आता ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. काही शेतकऱ्यांनी भाताची कापणी करून पीक वाळवण्यासाठी शेतात ठेवले होते, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे भातशेतीत पाणी साचून हे पीक पाण्यात भिजले आहे. कापलेले पीक सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली असून पिकाचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला आहे.