रत्नागिरी-गोवा महामार्गावर कंटेनर उलटून वाहतूक मंदावली; चालक किरकोळ जखमी
लांजा:
अंजणारी घाटात अपघात घडल्याची ताजी घटना मुंबई-गोवा महामार्गावर समोर आली असून, ब्रेक निकामी झाल्याने एक मच्छीवाहू कंटेनर संरक्षक भिंतीला धडकून रस्त्यावर कलंडला. लांजा तालुक्यातील अंजणारी घाटात सोमवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला असून, अपघातामुळे महामार्गावरील एका मार्गीिकेवरील वाहतूक काही काळ मंदावली होती.
ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथून मच्छी भरून गोव्याच्या दिशेने निघालेला (MH 08 W 4686) क्रमांकाचा कंटेनर अंजणारी घाटातील तीव्र उतारावर आला असता, अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. चालकाने वाहनावरील नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला; परंतु नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गाच्या संरक्षक भिंतीवर जोरात धडकला आणि एका मार्गीिकेवर उलटला. या अपघातात चालकाच्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

*मच्छी महामार्गावर विखुरली; पोलिसांची घटनास्थळी धाव
*
कंटेनर उलटल्यामुळे त्यातील मच्छी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विखुरली होती. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कंटेनर महामार्गाच्या एकाच मार्गीिकेवर पडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली नसली, तरी वाहनांचा वेग मंदावला होता. पोलिसांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अंजणारी घाट बनतोय अपघातांचे केंद्र
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी, वेरळ आणि वाकेड हे भाग अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखले जातात. महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर वेरळ व वाकेड परिसरातील अपघातांचे प्रमाण घटले असले, तरी अंजणारी घाटातील अपघातांची मालिका अद्याप कायम आहे. हा घाट अवजड वाहनांसाठी सातत्याने धोकादायक ठरत असल्याने येथे कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.













