खेड पोलिसांत गुन्हा दाखल
खेड:
मंत्र्यांचे पी.ए. असल्याचे भासवून सामाजिक कार्यकर्त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार खेड येथे उघडकीस आला आहे. चिपळूण परिसरातील अनधिकृत चिरा दगड खाणींचा प्रश्न राज्याचे गृह, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या बहाण्याने एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ५ हजार रुपयांची रक्कम उकळल्याप्रकरणी रविराज चिखले याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिरा खाणींवरील कारवाईसाठी मंत्र्यांच्या भेटीचे आमिष
या प्रकरणी विद्याधर दत्ताराम साळुंखे (वय ५६, मूळ रा. बोरगाव साळुंखेवाडी, ता. चिपळूण; सध्या रा. मुंबई सेंट्रल) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विद्याधर साळुंखे हे ग्रामीण भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरा खाणींमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांना मंत्री योगेश कदम यांच्याकडे मांडायचा होता. हीच संधी साधून संशयित आरोपी रविराज चिखले याने आपण ना. योगेश कदम यांचे खाजगी सचिव (पी.ए.) असल्याचे साळुंखे यांना भासवले आणि मंत्र्यांची थेट भेट घडवून देऊन कारवाईचे काम मार्गी लावण्याचे आमिष दाखवले.
कामाच्या नावाखाली उकळले रोख पैसे
मंत्र्यांच्या भेटीचे आणि काम पूर्ण करण्याचे आमिष दाखवून आरोपी रविराज चिखले याने १७ सप्टेंबर रोजी खेड येथे फिर्यादी विद्याधर साळुंखे यांच्याकडून रोख ५ हजार रुपये उकळले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने ना मंत्र्यांची भेट घडवून आणली ना कोणते काम केले. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साळुंखे यांनी खेड पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

संशयितावर गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
साळुंखे यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी संशयित आरोपी रविराज चिखले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.













