झेंडू, गुलाब आणि ऑर्किडच्या फुलांची देखणी आरास; रंगीबेरंगी फुलांनी उजळला गाभारा; भाविकांची गर्दी
पंढरपूर:
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पवित्र विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या औचित्याने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अत्यंत आकर्षक आणि मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही सुंदर पुष्पसेवा विठ्ठल-रुक्मिणी चरणी अर्पण केली असून, या देखण्या रूपाने मंदिर परिसर व गाभारा अधिकच खुलून दिसत आहे. * विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा आणि शोभिवंत पानांचा वापर*
या विशेष सजावटीसाठी देशातील व बाहेरील विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा तसेच पानांचा सुबक वापर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, तगर, गुलछडी, लक्ष्मी कमळ, ब्लू डेझी आणि पिंक डेझी यांसारख्या फुलांचा समावेश आहे. तसेच सजावटीला अधिक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी जिप्सोफिला, कमिनी, अशोकाची पाने, मनीप्लांट आणि ड्रॅसिना यांसारख्या शोभिवंत पानांची सुंदर रचना करण्यात आली आहे.
भाविकांचे लक्ष वेधून घेणारी सुबक मांडणी
विविध रंगांच्या फुलांची सुबक मांडणी आणि त्यांची अत्यंत कलात्मक रचना यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभारा व परिसर अतिशय नयनरम्य दिसत आहे. दसऱ्याच्या या पवित्र सणानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे ही आकर्षक पुष्प सजावट विशेष आकर्षण ठरत असून, भाविक या रूप, सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत.














