कोकण रेल्वे आणि केंद्रीय वखार महामंडळाचा संयुक्त प्रकल्प
रत्नागिरी:
महाराष्ट्रातील पहिले रेल्वे शीतगृह रत्नागिरीत उभारण्यात येणार असून, कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा, ताजी मासळी आणि नाशिवंत कृषी व सागरी उत्पादनांना देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कोकण रेल्वेने हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वे आणि केंद्रीय वखार महामंडळ (Central Warehousing Corporation) यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प साकारला जात असून, या कोल्ड स्टोरेजची क्षमता २ हजार टन इतकी असणार आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
साठवणुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा
कोकण किनारपट्टीवरून मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा, विविध फळे आणि ताज्या मासळीची वाहतूक केली जाते. मात्र, पुरेशा साठवणूक आणि शीतसाखळीच्या (Cold Chain) अभावामुळे या नाशिवंत उत्पादनांचे मोठे नुकसान होत असे किंवा उत्पादकांना त्यांचा माल अत्यंत कमी भावात विकावा लागत असे. हीच अडचण ओळखून कोकण रेल्वेने महसूल वाटपाच्या (Revenue Sharing) तत्त्वावर या अत्याधुनिक प्रकल्पाचे नियोजन केले आहे.
अत्याधुनिक उभारणी आणि दीड वर्षाचे उद्दिष्ट
या प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक जागा कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार आहे, तर प्रत्यक्ष अत्याधुनिक शीतगृहाची उभारणी आणि आर्थिक गुंतवणूक केंद्रीय वखार महामंडळामार्फत केली जाणार आहे. रत्नागिरीत उभारण्यात येणारे हे रेल्वे शीतगृह आगामी दीड वर्षात पूर्ण करून प्रत्यक्ष सेवेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

थेट मुंबई, दिल्ली अन् निर्यातीचा मार्ग मोकळा
या रेल्वे शीतगृहामुळे उत्पादकांना आपला माल दीर्घकाळ चांगल्या स्थितीत टिकवून ठेवता येणार आहे. इतकेच नव्हे, तर कोकण रेल्वेच्या माध्यमातून हा माल थेट मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्रांपर्यंत वेगाने आणि उच्च गुणवत्तेसह पोहोचवणे शक्य होणार आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना चांगला दर मिळण्यास मदत होईल.













