सोन्याच्या बांगड्या चोरून हातात घातल्या होत्या नकली बांगड्या; कर्जबाजारीपणामुळे शेजाऱ्यानेच केला खून
लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली रामगाव येथे ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून निर्घृण खून करत अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या संशयिताला रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले आहे. स्थानिक खबऱ्यांचे जाळे, तांत्रिक विश्लेषण आणि तीन स्वतंत्र तपास पथकांच्या वेगवान कारवाईमुळे या थरारक गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश आले. प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
घरात एकट्या असल्याचा फायदा घेऊन निर्घृण खून :
वेरवली रामगाव (लाडवाडी) येथील ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे (वय ७५ वर्षे) या सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी एकट्या होत्या. हीच संधी साधून संशयिताने घरात घुसून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या आणि कोणाला संशय येऊ नये या उद्देशाने त्याने वैशाली यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या व दोन पाटल्या ओरबाडून काढून घेतल्या आणि त्यांच्या हातात हुबेहूब दिसणाऱ्या नकली बांगड्या अडकवल्या. या धक्कादायक घटनेनंतर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१), ३०९(४) व ३३२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षकांकडून तातडीने पाहणी; तीन पथके रवाना :
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
कर्जबाजारीपणातून कृत्य; दीड किमी अंतरावरून आरोपी जेरबंद :
तपास पथकांनी घटनास्थळाच्या परिसरातील संशयितांची झाडाझडती आणि मोबाईल टॉवर डेटाचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. यामध्ये घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर राहणारा प्रमोद प्रकाश खेडेकर पोलिसांच्या रडारवर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. डोक्यावर प्रचंड कर्ज झाल्यामुळे ते फेडण्यासाठीच वृद्धेचा खून करून दागिने लुटल्याचे त्याने चौकशीत सांगितले. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.
कारवाई करणारे तपास पथक :
ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे (LCB), नीलकंठ बगळे (लांजा), अमित यादव (राजापूर) तसेच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड, पोलीस उपनिरीक्षक आमोद सरंगले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, संजय मारळकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईराम, दत्ता कांबळे आणि पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव, नितेश राणे, प्रियांका कांबळे, प्रतीक्षा राणे, अतुल कांबळे यांनी केली. अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल रत्नागिरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













