आरेवारे समुद्रकिनारी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक; ‘सिंधुरत्न’ योजनेतून पक्के स्टॉल देण्याचे आश्वासन
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आरेवारे येथे वनविभागाच्या थेट कारवाईमुळे रोजगारावर गदा आलेल्या स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी आरेवारे समुद्रकिनारी बाधित व्यावसायिकांची विशेष बैठक घेऊन तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा स्टॉल उभारून व्यवसाय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे.
वनविभागाच्या अनपेक्षित कारवाईने उडाली होती धावपळ
आरेवारे येथे काही स्थानिक व्यावसायिक अगदी आरेवारे पूल बांधल्याच्या काळापासून उदरनिर्वाहासाठी स्टॉल उभारून व्यवसाय करत होते. हळूहळू पर्यटनास चालना मिळाल्यानंतर मुख्य रस्त्याच्या कडेला आणि किनाऱ्यावर सुमारे २० ते २५ स्टॉल उभे राहिले होते. मात्र, वनविभागाकडे आलेल्या तक्रारींनंतर अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि बुलडोझर लावून सर्व स्टॉल उद्ध्वस्त केले होते. ऐन पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच ही कारवाई झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
पालकमंत्री उदय सामंत यांची आक्रमक भूमिका आणि बैठक
वनविभागाच्या या कठोर भूमिकेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. याची दखल घेत ना. सामंत यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आणि स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सोमवारी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, जि. प. सदस्या श्रीमती मोरे आणि पंचायत समिती सदस्य परेश सावंत यांनी आरेवारे पुलानजीक बाधित स्टॉलधारकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

२६ व्यावसायिकांना तात्पुरती परवानगी; ‘सिंधुरत्न’मधून पक्के स्टॉल देणार
या बैठकीत तोडगा काढत, कारवाईपूर्वी कार्यरत असलेल्या २६ स्टॉलधारकांनी तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा आपले स्टॉल उभारून व्यवसाय सुरू करावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून ‘सिंधुरत्न’ समृद्धी योजनेच्या माध्यमातून या व्यावसायिकांना लवकरच पक्के आणि सुटसुटीत स्टॉल उभारून दिले जातील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
"येथील सर्व बाधित स्टॉलधारकांचे म्हणणे ऐकून घेतले असून, २६ जणांना तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. पालकमंत्री उदय सामंत सिंधुरत्न योजनेतून लवकरच या सर्व व्यावसायिकांना कायमस्वरूपी स्टॉल उभे करून देणार असून यावर लवकरच प्रत्यक्ष कार्यवाही होईल."
— बाबू म्हाप (शिवसेना तालुकाप्रमुख व जि. प. सदस्य, रत्नागिरी)













