डाव्या बाजूनं ३ तर समोरून २ गोळ्या आल्या; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव
मुंबई:
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर एका पार्कच्या बाहेर बेछूट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुष्पा पार्कमधून घरी परतत असताना टायगर श्रॉफच्या गाडीवर दोघांनी हा जीवघेणा हल्ला केला, ज्यातून तो सुदैवाने थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून, अभिनेत्याने पोलीस चौकशीत या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
कसा घडला थरार? टायगरने सांगितला घटनाक्रम
पोलिसांना माहिती देताना टायगर श्रॉफने सांगितले की, तो पुष्पा पार्कमधून घरी परतत असताना त्याची गाडी गेटवर आली, त्याच वेळी गाडीवर बेछूट गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज येताच तो सतर्क झाला आणि सीटवर मागच्या बाजूला सरकला व तसाच स्तब्ध राहिला. त्याच्या दिशेने एकूण पाच गोळ्या झाडल्या गेल्या, त्यापैकी दोन समोरून आणि तीन डाव्या बाजूने आल्या होत्या.
हल्लेखोर रिहानने मारलेल्या गोळ्या टायगरच्या समोरून आरपार गेल्या, मात्र तो सीटवर मागच्या बाजूला सरकल्याने त्याला दुखापत झाली नाही. मात्र, त्यानंतरची दुसरी गोळी गाडीचा ड्रायव्हर फिरदौस बलुच याला लागली आणि या हल्ल्यात तो जखमी झाला. हल्लेखोर फुलसिंग नरेश याने टायगरवर समोरून गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी एक गोळी बोनेटवर आणि दुसरी विंडस्क्रिनवर जाऊन लागली.

सीसीटीव्ही आणि सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून खुलासा
या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, टायगर श्रॉफ मैदानातून आपल्या गाडीत बसून गेटवर आला असता, तिथे जमलेल्या गर्दीतच हल्लेखोर उपस्थित होते. गाडी गेटवर पोहोचताच हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. एक हल्लेखोर समोरून तर दुसरा टायगर बसलेल्या बाजूने गोळीबार करत होता. सुदैवाने टायगरच्या बाजूने गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची गन लोड झाली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दोन हल्लेखोरांसोबत पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला त्यांचा तिसरा साथीदारही तिथे उपस्थित होता. सहा ते सात राउंड फायर केल्यानंतर हे शूटर्स बाईकवरून पळून गेले. या हल्ल्यानंतर बॉलिवूड वर्तुळात खळबळ उडाली असून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.













