कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अडचणीत: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; अभिजीत दिपके घेणार कायदेशीर सल्ला
नवी दिल्ली:
कॉक्रोच जनता पार्टीला सोमवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले आहेत. आधीच विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या अडचणीत आणखी भर पडली असून, त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी या दोघांचे संपूर्ण प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवले आहे. पक्षाच्या नेत्यांना जामीन देण्यामध्ये हेतूपूर्वक उशीर केला जात असल्याचा गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आला असून, आशुतोष रांका आणि सौरभ दास बाहेर आल्यानंतरच पुढील रणनीती आखली जाईल, असे पक्षाचे नेते अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे.
नेमकी पार्श्वभूमी आणि विमानतळावरील कारवाई
कॉक्रोच जनता पार्टीने १० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाचे आयोजन केले होते. याच दरम्यान विमानातच आशुतोष रांका, सौरभ दास आणि अभिजीत दिपके यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जंतरमंतर येथे झेंडा फडकवण्याच्या प्रकरणात आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीने कनॉट प्लेसवर तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती. त्या वेळी पोलिसांनी अभिजीत दिपके यांनाही ताब्यात घेतले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांची सुटका करण्यात आली.
क्राईम ब्रँचकडे तपास आणि दाखल गुन्हे
पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्याशी संबंधित प्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रँचकडे सोपवला आहे. यांच्याविरोधात कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्येही त्यांच्यावर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अभिजीत दिपके यांची भूमिका आणि कायदेशीर लढा
या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी सांगितले की, पक्ष सध्या कोणत्याही नव्या आंदोलनाची घोषणा करत नाही. ते रविवारी म्हणाले होते की, पक्ष सध्या आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या सुटकेची प्रतीक्षा करत आहे. ते तुरुंगातून बाहेर आल्यावरच पुढील रणनीती निश्चित केली जाईल. सरकार पोलिसांच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवाई करत आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
या कायदेशीर लढ्यासाठी दिपके यांनी शनिवारी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेऊन कायदेशीर सल्ला घेतला आहे. जामीन प्रक्रियेमध्ये हेतूपूर्वक दिरंगाई केली जात असून त्यांच्या सुनावणीत अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.













