दुर्गंधीयुक्त पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा; खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

दुर्गंधीयुक्त पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा; खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

खेड-दापोली मार्गावर सांडणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण

खेड:
दुर्गंधीयुक्त पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी केली आहे. खेड-दापोली मुख्य रस्त्यावरून दापोलीच्या दिशेने मच्छी (कुटी) वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याने प्रवाशांना व स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत शिवसेनेचे खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), खेड यांच्याकडे निवेदनाद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे.

खेड-दापोली रस्त्यावर पसरतेय उग्र दुर्गंधी
खेड ते दापोली या मुख्य मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर मच्छीची (कुटी) वाहतूक करणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरू असते. या वाहतुकीदरम्यान वाहनांमधून पाझरणारे दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर सांडत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, पादचारी तसेच रस्त्याशेजारी राहणारे नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहेत.

आरटीओ प्रशासनाकडे कारवाईची मागणी

Arihant 3

अशा प्रकारे निष्काळजीपणे आणि आरोग्यास घातक ठरेल अशा पद्धतीने रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी सांडत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने रोख लावणे गरजेचे आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी खेड येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (RTO) लेखी निवेदन दिले असून, अशा बेजबाबदार वाहनचालकांवर व संबंधित वाहतूकदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली आहे.