स्थानिक मच्छीमारांची अडचण
रत्नागिरी:
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर किरकोळ दुरुस्तीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मासेमारी नौका दिवसभर उभ्या राहत असल्याने स्थानिक मच्छीमारांची मोठी गैरसोय होत आहे. मासेमारी करून परतलेल्या स्थानिक नौकांना मासळी उतरवण्यासाठी जेटीवर पुरेशी जागा मिळत नसल्याने बंदरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. याप्रकरणी मच्छीमार नेते नुरुद्दीन पटेल व बिलाल सोलकर यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त जे. डी. सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त नौकांची वर्दळ आणि कोंडी
मिरकरवाडा बंदरातील जेटींवर सुमारे ३०० नौका उभ्या करण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज ४५० ते ५०० नौकांची ये-जा सुरू असते. त्यातच दुरुस्तीसाठी येणाऱ्या एका परप्रांतीय नौकेसोबत अन्य तीन ते चार नौका जेटीवर उभ्या केल्या जात असल्याने कोंडीत आणखी भर पडत आहे. या अवाढव्य नौकांमुळे मासेमारी करून परतणाऱ्या स्थानिक नौकांना जेटीवर येण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.

प्रशासनाची भूमिका आणि सूचना
या पार्श्वभूमीवर मच्छीमार नेत्यांनी सोमवारी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन परप्रांतीय नौकांना मिऱ्या किंवा भगवती बंदरात पाठवण्याची मागणी केली होती. मात्र, नियमानुसार आश्रयासाठी किंवा दुरुस्तीसाठी आलेल्या राज्याबाहेरील नौकांना जेटी नाकारता येत नसल्याचे सहाय्यक आयुक्त सावंत यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी, दुरुस्ती पूर्ण होताच संबंधित नौका तातडीने हटवून जेटी मोकळी करण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या आहेत. काही स्थानिक मच्छीमार या परप्रांतीय नौका आपल्या असल्याचे सांगून त्यांना मदत करत असल्याची माहितीही समोर आली आहे. याबाबत बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून, जेटीवरील कोंडी दूर करण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.













