शहर पोलिसांत गुन्हा दाखल; हलगर्जीपणा आणि परवाना नसणे नडले
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील तेलीआळी परिसरातील गिरोबा चौकात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकासह एक तरुणी जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास श्री दत्त मंदिराजवळ घडला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी १८ ऑक्टोबर रोजी निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परवाना आणि विमा नसताना चालवत होता दुचाकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष निलेश पारकर (वय २४) हा आपल्या पल्सर दुचाकीवरून रुणाली राजेश शिवलकर (वय २३) हिला घेऊन जात होता. विशेष म्हणजे, चालक आयुष याच्याकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना (Driving License) नव्हता, तसेच संबंधित दुचाकीचा विमा (Insurance) देखील काढलेला नव्हता.

नियंत्रण सुटल्याने घडला अपघात
रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व हलगर्जीपणाने दुचाकी चालवल्यामुळे गिरोबा चौकातील दत्त मंदिराजवळ आयुषचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी जोरदार घसरली. या अपघातात गाडीवरून प्रवास करणारे दोघेही जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेश पारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित चालक आयुष पारकर याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.













