खडपोली दौऱ्यादरम्यान निवृत्त कामगारांनी विनायक राऊत यांना दिले निवेदन; चार दिवसांच्या रकमेत विसंगती असल्याचा आरोप
चिपळूण:
गाणे-खडपोली येथील ‘साफयिस्ट’ कंपनीच्या निवृत्त कामगारांना करारानुसार मिळणे अपेक्षित असलेल्या ग्रॅच्युइटीच्या रक्कमेपैकी चार दिवसांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याची गंभीर तक्रार कामगारांनी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या खडपोली दौऱ्यादरम्यान निवृत्त कामगारांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सुपूर्द केले. याप्रकरणी तातडीने लक्ष घालून पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीच्या सूचना करण्याचे ठोस आश्वासन विनायक राऊत यांनी कामगारांना दिले आहे.
नेमकी अडचण काय? करारात विसंगतीचा आरोप
निवृत्त कामगारांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित कर्मचारी कंपनीच्या सुरुवातीपासून म्हणजेच १९८२ सालापासून कार्यरत होते. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम दोन टप्प्यांत देण्यात आली.

करारातील अट: कराराप्रमाणे २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कामगारांना ३० दिवसांची ग्रॅच्युइटी मिळणे अपेक्षित आहे.
कंपनीचे वाटप: मुंबई मुख्य कार्यालयाकडून २५ दिवसांची आणि गाणे-खडपोली कार्यालयाकडून उर्वरित ५ दिवसांची रक्कम देण्यात आली.
कामातील तफावत: या हिशोबात मोठी विसंगती असून दुसऱ्या टप्प्यातील रकमेचा कोणताही स्पष्ट लेखी हिशोब दिलेला नाही. प्रत्यक्षात चार दिवसांची रक्कम थकीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
या प्रश्नाबाबत कामगारांनी कंपनीशी पत्रव्यवहार केला तसेच रत्नागिरीच्या कामगार आयुक्तांकडेही दाद मागितली, मात्र समजोत्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही.
युवासेनेची मध्यस्थी व ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित
यापूर्वी संबंधित निवृत्त कामगारांनी युवासेना पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर शहरप्रमुख सचिन भैय्या कदम, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे व उपशहर अधिकारी आकाश कदम यांनी कामगारांची भेट घेऊन कागदपत्रे व कराराची पडताळणी केली होती.
विनायक राऊत यांच्यासोबत झालेल्या या चर्चेप्रसंगी जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव उर्फ बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, शहरप्रमुख सचिन उर्फ भैय्या कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये आणि उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.













