पावस परिसरातील नाखरे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम: ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणखी ७ ते ८ बंधारे बांधण्याचा संकल्प
*पावस: *कमी पावसामुळे आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी नाखरे निर्मळ ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ श्रमदान मोहिमेला ग्रामस्थांचा अभूतपूर्व आणि भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. गावातील वाडी-वाडीवरील पुरुष व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून आजपर्यंत १२ वनराई बंधारे यशस्वीरीत्या बांधून पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांत आणखी ७ ते ८ बंधारे बांधण्यात येणार आहेत. या मोहिमेमुळे गावाच्या शिवारातील व विहिरींमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
सर्व स्तरांतून लोकसहभाग आणि अखंड परिश्रम
या उपक्रमात गावातील प्रत्येक वाडीतील नागरिक, तरुण मंडळे, महिला बचत गट, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, गावातील शासकीय व निमशासकीय महिला व पुरुष कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी/डॉक्टर, आरोग्य विभागाच्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तसेच नाखरे गावचे पोलीस पाटील, ग्रामपंचायत प्रशासक, माजी सरपंच, माजी उपसरपंच व माजी सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान केले.

विहिरींची पाणीपातळी वाढली; टंचाईची भीती दूर
ग्रामस्थांच्या या अखंड परिश्रमाचे यश अवघ्या काही दिवसांतच दिसून आले आहे. नदीपात्रात व पऱ्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी अडवल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून विहिरींनी उच्च पातळी गाठली आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि शेतीचे जलस्रोत समृद्ध झाले असल्याने, यंदाच्या उन्हाळ्यात जाणवणारी भीषण पाणीटंचाईची भीती आता पूर्णपणे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.













