राजापूर पोलिसांची धडक कारवाई: कोंडये ब्रिज गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी गणेश मोरे ३ वर्षांनंतर सोलापूरमधून जेरबंद

राजापूर पोलिसांची धडक कारवाई: कोंडये ब्रिज गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी गणेश मोरे ३ वर्षांनंतर सोलापूरमधून जेरबंद

तीन वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा: राजापूर पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापुरात सापळा रचून आवळल्या मुसक्या

राजापूर:
राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या बहुचर्चित आणि गंभीर गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यात राजापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून पोलीस यंत्रणेला चकवा देणाऱ्या गणेश शाहीर मोरे (रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आठ आरोपींवर आधीच दोषारोपपत्र; मूळ सूत्रधार मात्र फरार
राजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर ११२/२३ (भा.दं.वि. कलम ३५३, ४६७, ४६८, १२० (ब) आणि भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, २७) अन्वये दाखल गुन्ह्यात पुणे येथील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही (Chargesheet) दाखल करण्यात आले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील मूळ सूत्रधार असलेला गणेश मोरे हा गुन्हा घडल्यापासून मागील तीन वर्षांपासून सतत पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.

विशेष पथकाची सोलापुरात तांत्रिक जाळे फेकून कारवाई
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी जिल्ह्यातील फरारी व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याचे कडक निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी एका विशेष तपास पथकाची स्थापना केली.

Smruddhi homes

या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस अंमलदार दीपक काळे आणि सागर कातकर यांनी अत्यंत गोपनीय माहिती आणि अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीच्या हालचालींचा बारकाईने माग काढला. आरोपी सोलापूर परिसरात असल्याची पक्की बातमी मिळताच पोलिसांनी तिथे वेगाने सापळा रचून गणेश मोरे याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या कुख्यात आरोपीला जेरबंद केल्यामुळे राजापूर पोलिसांच्या या धडक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.