बँकिंग सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा मिळणार लाभ: ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी:
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत आर्थिक समावेशन योजनांच्या संतृप्ततेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम राबवली जाणार असून, जिल्ह्यातील सर्व बँका, ग्रामपंचायती आणि संबंधित शासकीय यंत्रणा यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतील. पात्र नागरिकांना बँकिंग सेवा, सामाजिक सुरक्षा योजना आणि विविध आर्थिक सुविधांचा थेट लाभ मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेअंतर्गत मिळणाऱ्या मुख्य सुविधा:
नवीन बँक खाती व विमा योजना: ‘प्रधानमंत्री जनधन योजने’अंतर्गत बँक खाती नसलेल्या नागरिकांची नवीन खाती उघडली जातील. तसेच ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’, ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ आणि ‘अटल पेन्शन योजने’मध्ये नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
खाते अद्ययावत व क्लेम मार्गदर्शन: बँक खात्यांचे पुनः-केवायसी (Re-KYC), वारसदार/नामनिर्देशन (Nomination) अद्ययावत करणे आणि निष्क्रिय पडलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यासाठी मदत केली जाईल. ‘आपकी पूंजी, आपका अधिकार’ उपक्रमांतर्गत दावा न केलेल्या ठेवींबाबत (Unclaimed Deposits) मार्गदर्शन केले जाईल.

शेतकरी कल्याण योजना: पात्र शेतकऱ्यांकडून किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी अर्ज स्वीकारले जातील, तसेच ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’बाबत सविस्तर माहिती व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
सायबर सुरक्षेबाबत जनजागृती: डिजिटल बँकिंगचा सुरक्षित वापर कसा करावा, सायबर फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि ओटीपी/पिनची गोपनीयता राखण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल.
ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन
या विशेष मोहिमेत बँक खाते नसलेले नागरिक, शेतकरी, पीएम-किसान लाभार्थी, महिला बचत गटांच्या सदस्या, ज्येष्ठ नागरिक आणि लहान व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ग्रामस्थांनी आपापल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून शिबिराची तारीख व वेळ जाणून घ्यावी आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. ग्रामपंचायत स्तरावर आयोजित या विशेष बँकिंग शिबिरांचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले आहे.













