खेड तालुक्यातील जामगे येथे माजी सैनिक मेळावा संपन्न: वीर पत्नींचा सन्मान आणि माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेश वाटप
खेड:
माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, यापुढे माजी सैनिकांच्या समस्यांचा दर तीन महिन्यांनी नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. माजी सैनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संघटनात्मक आणि शासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत मेळाव्याचे आयोजन
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा आणि समर्पाणानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत १६ ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील जामगे येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलमध्ये माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यास गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वीर पत्नींचा भावुक सत्कार करण्यात आला, तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.
माजी सैनिकांसाठी कॅन्टीन, वसतिगृह अन् विश्रामगृहाची सुविधा उभारणार
आपल्या भाषणात बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, "माजी सैनिकांसाठी असलेल्या योजनांचा मागील तीन महिन्यांत आढावा घेता आला नाही, ही माझी चूक आहे; मात्र यापुढे दर ३ महिन्यांनी या योजनांचा व समस्यांचा आढावा घेतला जाईल."
तसेच दापोली विधानसभा मतदारसंघातील माजी सैनिक वसतिगृहाच्या ठिकाणी राज्यपालांच्या नावे असलेली जागा त्यांच्याच नावावर कायम ठेवण्यात येईल. या ठिकाणी माजी सैनिकांसाठी कॅन्टीन, वसतिगृह आणि विश्रामगृह यांसारख्या सुविधा उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही कदम यांनी सांगितले.
पोलीस भरतीत अग्निवीरांना आरक्षण
गृहराज्यमंत्री म्हणून पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करत, अग्निवीरांना पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बिरादार, सैनिक स्कूलचे प्राचार्य डॉ. महादेव खोत, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्याधर ताटे, कल्याण संघटक राहुल काटे, वसतिगृह अधीक्षक योगेश बने, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन डी. डी. आखाडे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक, वीर पत्नी व वीर माता उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुनील कदम यांनी केले.













