विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रमोद महाजन संकुलाशेजारी रस्त्यावर मद्यपींचा ‘ओपन बार’; १०० हून अधिक जणांची दारू पिण्यासाठी गर्दी

विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रमोद महाजन संकुलाशेजारी रस्त्यावर मद्यपींचा 'ओपन बार'; १०० हून अधिक जणांची दारू पिण्यासाठी गर्दी

पोलिसांसमोरच मद्यपी पसार, कारवाई शून्य; उलट तक्रारदाराचाच व्हिडिओ काढणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचा तीव्र संताप

*रत्नागिरी : *शहरामध्ये आज दुर्गामाता विसर्जन मिरवणुकांचा उत्साह सुरू असतानाच, विसर्जन मार्गालगतच्या भागात मद्यपी कार्यकर्त्यांनी उघड्यावरच मद्यधुंद धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रमोद महाजन संकुल शेजारील रस्त्यावर विविध मंडळांच्या १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी अक्षरशः ‘ओपन बार’ थाटून रस्त्यावरच दारू ढोसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या डोळ्यांदेखत हे मद्यपी पळून गेले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता उलट तक्रार करणाऱ्या नागरिकाचाच व्हिडिओ काढण्याचा प्रताप पोलिसांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्त्यावर गाड्या पार्क करून १०० हून अधिक जणांची दारू पार्टी :

आज शहरात दुर्गामाता विसर्जन मिरवणुका मांडवी चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. याच मिरवणुकांच्या दरम्यान विविध मंडळांचे कार्यकर्ते मद्यप्राशन करण्यासाठी प्रमोद महाजन संकुल परिसरातील रस्त्यावर मोठ्या संख्येने जमले. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करून सुमारे १०० हून अधिक जण रस्त्यावर उघड्यावर बसूनच दारू ढोसत असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळाले. वास्तविक या परिसरात नेहमीच काही मद्यपी उघड्यावर दारू पीत असतात; मात्र आज विसर्जनाच्या दिवशी या मद्यपींनी सर्व मर्यादा ओलांडत विक्रमी गर्दी केली होती.

Lok. Tilak hospi.

नागरिकांनी ११२ वर संपर्क साधला; पोलिसांसमोरच मद्यपी पसार :

रस्त्यावर सुरू असलेल्या या उघड्यावरील दारू पार्टीमुळे परिसरातील रहिवासी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाच्या ‘११२’ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे; परंतु पोलिसांची गाडी पाहताच हे सर्व मद्यपी पोलिसांसमोरच तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

कारवाईऐवजी तक्रारदाराचाच काढला व्हिडिओ; नागरिकांमधून संताप :

पोलिसांसमोरून इतक्या मोठ्या संख्येने पळून जाणाऱ्या मद्यपींना पकडण्याचा किंवा त्यांची वाहने जप्त करण्याचा कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही. मद्यपींवर कोणतीही ठोस कारवाई न करता, उलट ज्या सुजाण नागरिकाने पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली, त्याच तक्रारदार नागरिकाचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात पोलीस व्यग्र दिसले. पोलिसांच्या या अनाकलनीय आणि बेजबाबदार भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या उघड्यावरील दारू अड्ड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कधी होणार, असा संतप्त सवाल आता स्थानिक रहिवासी विचारत आहेत.