Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल: ‘महाराष्ट्राला कलंक’ म्हणत छेडले सत्ता बदलाचे रणकंदन

Uddhav Thackeray Dasara Melava: उद्धव ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल: 'महाराष्ट्राला कलंक' म्हणत छेडले सत्ता बदलाचे रणकंदन

शिवाजी पार्कवरील हीरक महोत्सवी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा; शेतकरी, कायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबई:

भाजपने स्वप्ने दाखवून देशातील जनतेची फसवणूक केली असून हा देशातील सगळ्यात मोठा ‘संभ्रम घोटाळा’ आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावरील हीरक महोत्सवी दसरा मेळाव्यात शिवसैनिकांच्या अथांग जनसागरासमोर बोलताना त्यांनी आगामी सत्ता बदलाचे रणकंदन पुकारले. छत्रपती शिवाजी महाराज, संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आता भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे, अशी ठणकदार हाक त्यांनी या वेळी दिली.

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत पार पडलेल्या या मेळाव्यात लोकशाही, मतचोरी, ‘जेन झी’ (Gen Z) तरूणांचे आंदोलन, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हे मुद्दे उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या केंद्रस्थानी होते.

Shanti2

शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारवर संताप
राज्य सरकारने दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीवरून ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आमदारांना ५०-५० खोके दिले जातात, मात्र बळीराजाला द्यायला पैसे नाहीत, या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. दुष्काळामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना केवळ आकड्यांचा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. परभणीत मुलाला सहलीसाठी पैसे देता आले नाहीत म्हणून हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची विदारक घटना त्यांनी अधोरेखित केली.

कायदा-सुव्यवस्था आणि ‘शहरी नक्षलवाद’ मुद्द्यावरून गृहमंत्र्यांवर टीका
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबाराच्या घटनेचा दाखला दिला. उत्तर प्रदेशातून आलेले हल्लेखोर मुंबईत पोहोचतात कसे, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला. महाराष्ट्र हे शहरी नक्षलवादाचे केंद्र असल्याचे सरकारने न्यायालयात म्हटल्याचा संदर्भ देत, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई साबरमती कारागृहात बसून सूत्रे हलवत असेल, तर गृहमंत्री काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादी बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? हे गृहमंत्री महाराष्ट्राला कलंक आहेत," अशी टीका त्यांनी केली.

मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर ताशेरे
निवडणूक प्रक्रियेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, १३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून सीमेवर देश वाचवण्यासाठी लढणाऱ्या महिला लष्करी अधिकाऱ्याचे नावही त्यात समाविष्ट होते. हे सर्व लोक बांगलादेशी आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. मतदार प्रक्रियेत घोटाळा करणारे ज्ञानेश कुमार हे केवळ एक प्यादे असून सत्ताधारी मोदी आणि शहा यांचा जीव त्यांच्या राजीनाम्यात असल्याचे ते म्हणाले.

पुस्तके वगळण्याचा डाव आणि हिंदुत्वावर भाष्य
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाबाबतचे पुस्तक आणि महात्मा फुल्यांचे जातीपातीबाबतचे पुस्तक वगळण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत खरा हिंदुत्ववाद जपला, मात्र आजचा राजा सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

‘जेन झी’ आंदोलनावरून पोलिसांच्या कारवाईचा निषेध
तरुणांच्या ‘जेन झी’ आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. लोकशाही आणि मतदानाचा अधिकार मागणाऱ्या तरुणांना गुंड ठरवून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या कृतीला सरकारची सभ्यता म्हणायचे का, असा सवाल त्यांनी विचारला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा त्यांचे वयही याच तरुण पिढीचे होते, याची आठवण त्यांनी करून दिली.