गोरेगावच्या नेस्को सेंटरवरील मेळाव्यात शिंदेंचा विरोधकांवर पलटवार; शेतकऱ्यांच्या लेकींच्या विवाहाची मोठी घोषणा
मुंबई:
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले असताना, महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करणे हीच राज्यातील सर्वात मोठी ‘व्होट चोरी’ होती, असा स्फोटक आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे शिंदेंच्या शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा (Shivsena Eknath Shinde Dassara Melava 2026) अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवत अनेक राजकीय मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.
आम्ही केवळ भाषणबाजी करणारे नेते नसून शेतकऱ्यांच्या चुली पेटवणारे आणि जनतेला थेट मदत करणारे आहोत, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. संकटाच्या काळात ट्रकमधून मदत पाठवण्यासाठी मोठी हिंमत लागते, तुम्ही कधी साधा एक बिस्किटचा पुडा तरी दिला का? असा सवाल त्यांनी केला. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी माझ्या शेतकरी बळीराजाच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांवर संविधानाच्या गैरवापराचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल विरोधकांचा तीव्र शब्दांत समाचार घेण्यात आला. पंतप्रधान मोदींचा ३६ देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला आहे, मात्र एकही दिवस सुट्टी न घेता देशसेवा करणाऱ्या नेत्यावर टीका करणाऱ्यांना देशाची १४० कोटी जनता कधीही माफ करणार नाही, असे शिंदे म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेणे हा देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे सांगत, एका हातात संविधान घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या घटनात्मक संस्थांवर हल्ले करायचे, असा देश तोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे ते म्हणाले.
भाषण संपताच एकनाथ शिंदेंनी आयोजकांना दिली वॉर्निंग
नेस्को सेंटरवरील आपले जाहीर भाषण संपवून एकनाथ शिंदे मंचाच्या मागच्या बाजूला निघाले होते, मात्र व्यासपीठावरील नियोजनावरून ते चांगलेच संतापल्याचे दिसून आले. माईकची योग्य ती व्यवस्था आणि आपली बसण्याची जागा कोपऱ्यात ठेवल्यामुळे त्यांनी थेट माईकजवळ येत आयोजकांचे कान टोचले. "अरे आयोजन कुणी केलेलं? मला कोपऱ्यात कोणी टाकलं? पुढच्या वेळेस मला लोकांच्या समोर पाहिजे, लक्षात ठेवा…" अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आयोजक कार्यकर्त्यांना सक्त ताकीद दिली, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. शेतकऱ्यांसाठी आणि लेकींसाठी महत्त्वाच्या घोषणा
या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदेंनी शेतकरी कल्याणासाठी राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली:
दिवाळीचा शिधा व रेशन: शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा शिधा वाटपाचे काम प्रभावीपणे सुरू करण्यात आले आहे.
कौशल्य व साधनसामग्री वाटप: परभणीत २५ हजार शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकलींचे वाटप करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
सामूहिक विवाह सोहळे: शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली असून, त्यांच्यासाठी भव्य सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातील, अशी घोषणा त्यांनी केली.













