शिवसेनेला ६० वर्षे पूर्ण; दसरा मेळाव्यात संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप आणि पंतप्रधान मोदींवर टीका
मुंबई:
शिवसेनेच्या ६० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासावर आणि विचारसरणीवर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी, "शिवसेना दोन नाहीत, शिवसेना एकच आहे आणि ती आमची आहे," असे स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
या मेळाव्यात बोलताना संजय राऊतांनी कायदा-सुव्यवस्था, अंडरवर्ल्ड, राम मंदिर प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आणि ‘जेन झी’ (Gen Z) तरुणांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारला अक्षरशः धारेवर धरले.

अमित शहांवर अत्यंत गंभीर आरोप
राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊतांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेची बाण सोडले. "लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हाच लॉरेन्स बिश्नोई आहे," असे वादग्रस्त व प्रखर विधान त्यांनी केले. देशाच्या गृहमंत्र्यांवर कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असताना तेच जर अशा भूमिकेत असतील, तर आम्हाला देशात ‘रेजीम चेंज’ (सत्ता बदल) करायचा आहे, असे त्यांनी जाहीर केले. त्यांची शिवसेना ‘टिकाऊ’ असून विरोधकांची शिवसेना ‘विकाऊ’ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
धनुष्यबाण आणि पक्षाच्या भूमिकेवर भाष्य
शिवसेनेसोबत अनेक आले आणि गेले, पण शिवतीर्थावरील गर्दी कधीही कमी झालेली नाही, असे सांगत राऊतांनी पक्षाच्या वर्षानुवर्षे टिकलेल्या जनधारावर विश्वास व्यक्त केला. आजच्या पूजेला आमच्याकडे धनुष्यबाण नसेल, परंतु पुढच्या वेळी तो आपलाच असेल. आम्ही धर्मरक्षक आहोत आणि शेवटपर्यंत धनुष्यबाण सोडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
‘जेन झी’ आणि राहुल गांधींच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले
तरुणांच्या ‘जेन झी’ आंदोलनाचा उल्लेख करत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर ताशेरे ओढले. "जेनझींचं नाव घेतलं की मोदी-शहांच्या बुडाला आग लागते. राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र याच जेनझी तरुणांनी नरेंद्र मोदींना ‘छोटा बंदर’ करून ठेवले," अशी टीका त्यांनी केली. कोणताही प्रश्न विचारला की ‘जय श्रीराम’ बोलण्याची सवय लागली आहे, पण आता जनतेने तुम्हालाच जायची वेळ आणली आहे, असा इशारा त्यांनी दिला.
राम मंदिराच्या मुहुर्तावरून आणि चोरीवर सवाल
अभिजात मुहुर्तात झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवर संशय व्यक्त करताना त्यांनी गंभीर आरोप केले. "मोदीजी, तुमचा मुहूर्त चुकला होता. राम मंदिरात काय-काय चोरी झाली हे माहितीये का? प्रभू श्रीरामांचे अलंकार, सीतेची कर्णफुले, २७ मंगळसूत्रे आणि श्रीरामांच्या पादुका चोरीला गेल्या. सीसीटीव्ही बंद करून दानपेट्या चोरल्या गेल्या," असा दावा त्यांनी केला. तसेच आगामी काळात पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार सत्तेतून बाहेर जातील, असा दावा करत सध्या जनता रस्त्यावर उतरल्यामुळे पंतप्रधान भूमीगत झाल्याची टीका त्यांनी केली.













