Ratnagiri Nivyaacha Raja: रत्नागिरीच्या ‘निव्याचा राजा’चा ऐतिहासिक मान! ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला

Ratnagiri Nivyaacha Raja: रत्नागिरीच्या ‘निव्याचा राजा’चा ऐतिहासिक मान! ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला

निवे बुद्रुक गावासाठी अभिमानास्पद क्षण; मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव

रत्नागिरी:

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ चे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील युवा गणेश मित्र मंडळ, अर्थात सर्वसामान्यांचे लाडके ‘निव्याचा राजा’ (निवे बुद्रुक) या मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे मानाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले आहे. या ऐतिहासिक यशाने संपूर्ण निवे बुद्रुक गावामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा-संस्कृतिक वर्तुळात आनंदाची व अभिमानाची लाट पसरली आहे.

१२ मित्रांच्या छोट्या प्रवासापासून ते राज्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
या मंडळाची स्थापना सन २००७-२००८ च्या सुमारास अवघ्या १२ तरुण मित्रांनी एका छोट्याशा खोलीत बसून केली होती. सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात स्थानिकांच्या विरोधाचाही सामना करावा लागला, परंतु सर्व मित्रांची अफाट एकजूट, दुर्दम्य जिद्द आणि अथक परिश्रमांमुळे हे मंडळ आज एका मोठ्या वटवृक्षासारखे भक्कमपणे उभे राहिले आहे. आज या मंडळात तब्बल ५० हून अधिक सक्रिय सदस्य पूर्ण निष्ठेने कार्यरत आहेत.

Kohinoor furni.

यापूर्वीही या मंडळाला विविध स्तरांवर अनेकमानाचे सन्मान लाभले आहेत:

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र शासन – संगमेश्वर तालुका प्रथम सन्मान

रत्नागिरी पोलीस अधीक्षक सन्मान

देवरूख पोलीस ठाणे सन्मान

मंगलमूर्ती सजावट स्पर्धा सन्मान व शिस्तप्रिय मंडळ सन्मान

सामाजिक बांधिलकी आणि ‘किल्ले महिमतगड’चा विशेष देखावा
केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता या मंडळाने नेहमीच सामाजिक आणि ऐतिहासिक जाणिवा जोपासल्या आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, इतिहास साक्ष देणारे देखावे आणि धार्मिक देखाव्यांची परंपरा त्यांनी कायम राखली आहे. यंदाच्या वर्षी ‘किल्ले संवर्धन काळाची गरज – किल्ले महिमतगड’ हा अत्यंत प्रबोधनपर आणि जनजागृती करणारा विशेष देखावा ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ यांच्या मोलाच्या सहकार्याने सादर करण्यात आला होता, ज्याची सर्वत्र चर्चा झाली.

वर्षभर चालणारे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम
‘निव्याचा राजा’ मंडळ केवळ गणेशोत्सवातच नव्हे, तर वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण करत असते. यामध्ये खालील उपक्रमांचा प्रामुख्याने समावेश आहे:

सांस्कृतिक महिला फुगडी कार्यक्रम, खेळ पैठणीचा व होम मिनिस्टर

शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला व निबंध स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान

वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, नदीपात्र स्वच्छता व मंदिर स्वच्छता अभियान

ज्येष्ठांचा सन्मान, विधवा माता सन्मान, आरोग्य व रक्तदान शिबिरे

छत्रपती शिवाजी महाराज जीवन परिचयावर विशेष व्याख्यानांचे आयोजन

या उल्लेखनीय प्रवासात आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जि.प. सदस्य प्रमोद अधटराव, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, जि.प. सदस्य नेहा रवींद्र माने, संगमेश्वरचे उपसभापती प्रफुल्लचंद्र बायीत तसेच जनक जागुष्टे यांचे खारीचे वाटा आणि आशीर्वाद लाभले आहेत. गणरायाप्रती असलेली अचल निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि वर्षानुवर्षे केलेल्या निस्वार्थी सेवेचे हे सुमधुर फलित आहे. हे यश केवळ एका पारितोषिकाचे नसून अनेक वर्षांच्या मैत्रीचे, त्यागाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे.

दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान
हा अत्यंत मानकरी आणि दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ३ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर (पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई) येथे पार पडला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या ऐतिहासिक यशाबद्दल सुरेश कदम यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस भरभरून आशीर्वाद दिले. तसेच या दैदिप्यमान यशासाठी मंडळाचे सर्व जुने-नवे सदस्य, पदाधिकारी आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या समस्त ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.