एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून रचला गेला कट; मुंबई पोलिसांच्या ताब्यात सर्व आरोपी
मुंबई:
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या सनसनाटी गोळीबार प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला एक मोठे यश हाती लागले आहे. या गंभीर प्रकरणाशी संबंधित चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये गुन्हेगारांपर्यंत पिस्तूल व काडतुसे पोहोचवणाऱ्या दोन तरुणींचाही समावेश आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे.
असा रचला गेला संपूर्ण कट
पोलिसांनी दिलेल्या तपासातील माहितीनुसार, नुकताच जामिनावर बाहेर आलेला मुख्य आरोपी कुणाल याची ओळख अनिल पंडित नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. हे दोघेही एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून सतत एकमेकांच्या संपर्कात होते. अनिल पंडितच्या सूचनेनुसार, कुणालने सुमितच्या मदतीने अमृतसर येथून एक पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे गोळा केली होती. या दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी कुणालची भेट राधा हिच्याशी झाली. त्याने आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी तिच्यासमोर उघड करून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि तिला बेकायदेशीर हत्यारासह मुंबईत जाण्यासाठी तयार केले.

रेल्वे प्रवासापासून ते दादरमधील हॉटेलपर्यंतचा घटनाक्रम
१५ ऑक्टोबर: कुणालने राधा आणि बबीता या दोन्ही तरुणींना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर सोडले. यादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल राधाच्या बॅगेत लपवण्यात आले होते. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपद्वारे सतत राधाच्या संपर्कात राहून तिला अनिल पंडितच्या सूचना पोहोचवत होता.
१७ ऑक्टोबर: दोन्ही तरुणी मुंबईतील दादर येथे उतरून एका हॉटेलमध्ये मुक्कामास राहिल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर एका अल्पवयीन मुलाने राधाकडून ती हत्याराची बॅग ताब्यात घेतली.
१८ ऑक्टोबर: याच दिवशी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर अनिल पंडितने कुणालला फोन करून शूटर मुंबईत अडकल्याची माहिती दिली आणि त्यांना तेथून पळून जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करण्याचे आदेश दिले.
२० ऑक्टोबर: गोळीबार झाल्यानंतर राधा आणि बबीता हरिद्वार एक्सप्रेसने मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाल्या. दिल्ली पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि धडक कारवाई करत राधा आणि बबीता यांना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून, तर कुणाल आणि सुमित या दोघांना सोनिपत येथून बेड्या ठोकल्या.













