Ramdas Kadam: “एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार, पण काय झालं माहित नाही”; दसरा मेळाव्यात रामदास कदमांचं मोठं वक्तव्य

Ramdas Kadam: "एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार, पण काय झालं माहित नाही"; दसरा मेळाव्यात रामदास कदमांचं मोठं वक्तव्य

"संजय राऊत तू शिवसैनिक आहे का?" – रामदास कदम

मुंबई:

शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्याच्या मंचावरून विरोधकांवर आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला. यंदाच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आणि त्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार निवडून आले, असे सांगत रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे हेच भावी आणि खरे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्रीपदाच्या फेररचनेवर बोलताना ते म्हणाले की, "मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार एकनाथ शिंदे साहेबच होते, पण नेमके काय घडले हे मला माहीत नाही, ते फक्त शिंदेसाहेबांनाच माहीत असेल," असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

Kohinoor furni.1

संजय राऊतांना खडेबोल आणि ठाकरे गटावर टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका करताना रामदास कदम म्हणाले, "आमचे व्यासपीठ पाहा आणि त्यांचे व्यासपीठ पाहा. संजय राऊत तू आधी तू खरा शिवसैनिक आहेस का? हे सांग." जर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिले नसते, असा दावा त्यांनी केला. "आज उद्धवजींच्या मागे कोणीही उरलेले नाही, तर एकनाथ शिंदेंच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे," अशी गर्जना त्यांनी केली.

मनोज जरांगे पाटलांना सज्जड दम व गंभीर आरोप
या मेळाव्यात रामदास कदम यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. "आम्ही कधीही तुमच्या विरोधात बोललो नाही, पण काल तुम्ही ५०० कोटी रुपयांबाबत जे काही बोललात आणि एकनाथ शिंदेंना उद्ध्वस्त करायला निघालात, तर महाराष्ट्रातील मराठा समाजच तुम्हाला उद्ध्वस्त करेल," असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, "एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. शिंदेंवर बोलण्यापूर्वी तुझी औकात काय, हे पाहा. पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री, कोणाबद्दलही एकेरी भाषेत बोलणे खपवून घेतले जाणार नाही," असे सांगत त्यांनी जरांगे यांच्या संपत्तीची आणि गाड्यांची चौकशी करण्याची मागणी केली. शिंदे हे देणारे आहेत, घेणारे नाहीत; कोणीतरी सुपारी घेऊन त्यांना बदनाम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.