गावडेआंबेरे-कापुसतळी येथील थरारक घटना; १८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे-कापुसतळी येथे मृत व्यक्तीकडील उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कोयती फेकून प्राणघातक हल्ला केल्याची उघडकीस आली आहे. या हिंसक हल्ल्यात रविंद्र रामा लाकडे (वय ४७, रा. खारवीवाडा, गावडेआंबेरे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोराने केवळ कोयतीनेच वार केला नाही, तर संतापून त्यांच्या उजव्या गालाचा चावा घेतल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रविंद्र लाकडे हे आपल्या घरी जात असताना आरोपी नितीन बाबल्या डोर्लेकर (रा. गावडेआंबेरे-कापुसतळी) याने त्यांना अडवले. आरोपीने त्यांच्याकडे मृत रत्नाकांत रामचंद्र नाटेकर यांच्याकडील उधारीच्या पैशांची मागणी केली. यावर रविंद्र लाकडे यांनी संबंधित व्यक्तीचे निधन झाले असून, त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी येऊन उधारीचे पैसे घ्यावेत, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या उत्तराचा राग आल्याने आरोपी नितीन डोर्लेकर याने अचानक आक्रमक होत आपल्याकडील कोयती लाकडे यांच्या दिशेने फेकून मारली. ही कोयती लाकडे यांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने धावत येऊन त्यांच्या उजव्या गालाचा चावा घेतला. तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पूर्णगड पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी पूर्णगड पोलीस ठाण्यात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद: पूर्णगड पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६.
कलमे: भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १११, ११५(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे गावडेआंबेरे आणि परिसर परिसरात मोठी चर्चा रंगली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.













