Chiplun Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ भीषण अपघात: गतिरोधकावर कारला भरधाव १२ चाकी ट्रकची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Chiplun Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ भीषण अपघात: गतिरोधकावर कारला भरधाव १२ चाकी ट्रकची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

ट्रकचालकावर गुन्हा दाखल

चिपळूण:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण पॉवरहाऊस परिसरात १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. गतिरोधकावर वेग कमी करणाऱ्या एका अर्टिगा कारला पाठीमागून आलेल्या भरधाव १२ चाकी ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

गतिरोधकावर वेग कमी करताच पाठीमागून धडक
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कल्याण (पश्चिम) येथील मुरबाड रोड परिसरात राहणारे संकेत शिवाजी गुरव (वय ३५) हे १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह अर्टिगा कारने (क्रमांक MH 05 EQ 3524) मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होते. चिपळूण पॉवरहाऊस जवळील गतिरोधकावर (Speed Breaker) आल्यानंतर त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कारचा वेग कमी केला.

Shanti 4

नेमक्या याच वेळी पाठीमागून अत्यंत बेदरकारपणे व अनियंत्रित वेगाने आलेल्या भारत बेंझ कंपनीच्या बाराचाकी ट्रकने (क्रमांक MH 12 LT 2057) अर्टिगा कारला मागून थेट जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील श्वेता शिवाजी गुरव आणि शिवाजी बाबाजी गुरव हे दोघे गंभीर जखमी झाले.

ट्रकचालकावर गुन्हा दाखल
अपघातानंतर संकेत शिवाजी गुरव यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक लालचंद कुंजू महातो (सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी; मूळ रा. तोपचाची, धनबाद, झारखंड) याच्याविरुद्ध वाहनाचा वेग अनियंत्रित ठेवून, निष्काळजीपणाने चालवून अपघात घडवून आणल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. महामार्गावरील पॉवरहाऊस परिसरातील गतिरोधकांजवळ अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.