२३ हजार ५५२ कोटींची कामे प्रगतीपथावर; प्रवासी सुविधा आणि पायाभूत विकासासाठी १०० कोटींहून अधिक खर्चाचे नियोजन
रत्नागिरी:
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून एक नवा आर्थिक टप्पा गाठला आहे. मागील केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वेने २० हजार ५९ कोटी रुपयांचे नवे प्रकल्प मिळवले असून, सध्या तब्बल २३ हजार ५५२ कोटी रुपयांची विविध विकासकामे वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेने यशस्वी प्रवासाची ३७ वर्षे पूर्ण केल्याच्या औचित्याने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे ३७ वा वर्धापन दिन अत्यंत दिमाखात साजरा केला. या सोहळ्याला कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा, संचालक सुनील गुप्ता, संचालक राजीव कुमार मिश्रा, मुख्य दक्षता अधिकारी अविनाश तरहावडेकर आणि कोकण रेल्वे महिला सांस्कृतिक व सामाजिक सेवा संघटनेच्या अध्यक्षा मनीषा झा उपस्थित होत्या. याप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्रवासी सुविधांसाठी ५ वर्षांत १०५ कोटींचा निधी
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांचे आधुनिकीकरण आणि प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे:
निधीची तरतूद: प्रवासी सोयी-सुविधांच्या विस्तारासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात २०.७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुढील ५ वर्षांत तब्बल १०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
आधुनिक सुविधा: स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने (Escalators), हाय-लेव्हल प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचा विस्तार, दिव्यांगांसाठी स्पर्शक्षम (Tactile) टाइल्स, वातानुकूलित लाउंज आणि युपीआय (UPI) पेमेंटसह अद्ययावत तिकीट प्रणाली विकसित केली जात आहे.
सुरक्षा व देखभाल: सुरक्षा ऑडिट अंतर्गत सर्व फूट ओव्हर ब्रिजेसचे (FOB) स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून २१ एफओबींची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.
विशेष गाड्यांची सोय: एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान कोकण रेल्वेने २४५ उन्हाळी स्पेशल, ३७९ गणपती स्पेशल आणि ५ एफटीआर (FTR) स्पेशल गाड्या यशस्वीरीत्या चालवून प्रवाशांना मोठा दिलासा दिला.
लोटे येथील आरएससीएफ कंत्राट: लोटे येथील रोलिंग स्टॉक कारखान्याच्या (RSCF) देखभाल व दुरुस्तीसाठी २४९ कोटी रुपयांचे ५ वर्षांचे कंत्राट मिळाले असून २ ते ४ सप्टेंबर २०२६ पासून तेथे एलएचबी (LHB) डब्यांची निर्मिती व ओव्हरहॉलिंग सुरू करण्यात आले आहे.
मालवाहतूक व रत्नागिरीत कोल्ड स्टोरेज योजना
कोकण रेल्वेने वार्षिक २.६ दशलक्ष टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तिकीट तपासणी मोहिमेतून रेल्वेला १५.०४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, ज्यामध्ये विशेष पथकांच्या मोहिमांमधून ६.२३ कोटी रुपयांची वसुली झाली.
कोकण रेल्वेकडून रत्नागिरी येथे कंटेनर सायडिंग आणि कोल्ड स्टोरेज विकसित केले जात आहे. आगामी वर्षात खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कुडाळ, झारप, मुर्देश्वर आणि मणकी या स्थानकांवर कोल्ड-चेन सुविधा, वेर्णा, इंदापूर व रत्नागिरी येथे सायलो (Silo) सुविधा उभारली जाणार आहे. तसेच खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि झारप येथे आधुनिक गोदामे (Warehouses) उभारून कोकणातील कृषी व औद्योगिक मालवाहतुकीला मोठी गती देण्याची योजना आखण्यात आली आहे.













