Manoj Jarange Eknath Shinde Allegations: एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप, जरांगे पाटील उद्या सकाळी ११ वाजता पुरावे देणार

Manoj Jarange Eknath Shinde Allegations: एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोप, जरांगे पाटील उद्या सकाळी ११ वाजता पुरावे देणार
नारायण गडावरील दसरा मेळाव्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; रामदास कदमांच्या टीकेलाही जरांगेंचे थेट उत्तर

जालना/मुंबई:

नारायण गडावर पार पडलेल्या भव्य दसरा मेळाव्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमधील वाद अधिक चिघळला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नावाने भारतीय जनता पक्षाकडून तब्बल ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात केला होता. या आरोपांवर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षाने स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान दिल्यानंतर आज जरांगे पाटलांनी आणखी एक मोठा बाँब फोडला आहे. उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या ५०० कोटींच्या आरोपांचे थेट पुरावे सादर करणार, अशी घोषणा जरांगे यांनी केली आहे.

“मी उद्ध्वस्त होणार नाही, मराठा समाज एवढा लेचापेचा नाही”
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेचा समाचार घेताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “माझ्या पाठीमागून मला कोणी वाकडे करू शकत नाही. मी माझ्या समाजाच्या अस्तित्वासाठी प्रामाणिकपणे लढत आहे. मी उद्ध्वस्त होणार नाही, मराठा समाज एवढा लेचापेचा नाही, त्यामुळे कोणी माझी काळजी करू नये. मी स्वतःवरून कोणावर आधी बोलत नाही, पण माझ्या अंगावर कोणी आले तर मी त्याला सोडत नाही.”

Ratnagiri Khabardar add image

पुढे बोलताना त्यांनी नारायण राणे आणि रामदास कदम यांच्याबद्दल संयमी भूमिका मांडली. “मी राणेदादांबद्दल कधी बोललो नाही, त्यांच्या मुलांना बोललो. तसेच रामदासभाईंबद्दलही मी बोललो नाही. ते एकेकाळी भगव्यासाठी चांगल्या प्रकारे लढणारे नेते होते. पण जर पुरावेच हवे असतील, तर उद्या सकाळी ११ वाजता प्रेस घेऊन सर्व पुरावे समोर ठेवेन,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

“कुजबुजीकडे लक्ष देऊ नका”; रामदास कदमांचे पुन्हा आवाहन
दुसरीकडे, दसरा मेळाव्यात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या रामदास कदमांचा सूर काहीसा मवाळ झाल्याचे पाहायला मिळाले. “आपण सर्व मराठा समाजाचे आहात. कुठे काय कुजबूज होते आहे याकडे लक्ष देऊ नका. ज्याच्यात हिंमत असेल तो समोर येऊन बोलेल, त्यानंतर त्याला उत्तर द्या,” असे आवाहन रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटलांना केले आहे.

नारायण गडावरील शक्तिप्रदर्शन आणि त्यापाठोपाठ ५०० कोटींच्या कथित देवाणघेवाणीवरून सुरू झालेल्या या राजकीय नाट्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुरते तापले असून उद्या सकाळी ११ वाजता जरांगे पाटील कोणते पुरावे समोर आणतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.