शीळ धरणावरील जॅकवेल आणि नाचणे तलावाच्या जलवाहिनीसाठी मिळणार निधी
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरावर ओढवणारे संभाव्य पाणीसंकट टळावे आणि पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पाणीपुरवठा समिती सभापती निमेष नायर यांच्याकडून कोणत्या तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती घेऊन त्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही पालकमंत्र्यांनी सुरू केली आहे.
यापूर्वी नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने शीळ धरणाच्या ठिकाणी केलेल्या कामाचे थकीत बिल अदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. त्यानुसार सुमारे ७५ लाख रुपयांचे बिल अदा करण्यास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

यंदा केवळ ८५ दिवस पाऊस; पाण्याचे बाष्पीभवन वेगाने
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ११२ दिवस पाऊस पडतो; मात्र यंदा केवळ ८४ ते ८५ दिवसच पाऊस झाला आहे. तसेच कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने पाणी टंचाईचा धोका वाढला आहे.
यावर मात करण्यासाठी दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असून, पाटबंधारे विभागाने आठवड्यातून किमान दोन दिवस तरी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा सल्ला नगर परिषदेला दिला आहे.
पानवल धरणापासून १३०० मीटर जलवाहिनीचे काम सुरू होणार
शहर पाणीपुरवठा करणाऱ्या पानव्हल धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी धरणाकडून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण होते. शीळ धरण येथील कामाचे १ ते १.५ लाख रुपयांचे बिल थकल्यामुळे कंत्राटदार कंपनीने काम रोखले होते.
सर्वसाधारण सभेने या कामाचे पैसे देण्याचा ठराव घेतल्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. कंत्राटदार कंपनीला निधी मिळाल्यानंतर पानवल धरणाकडून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १३०० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
नाचणे तलावातील गाळ उपसा आणि जॅकवेलची दुरुस्ती
नाचणे तलाव: तलावातील साचलेला गाळ उपसा करून हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी जलवाहिनी टाकावी लागणार आहे.
शीळ धरणावरील जॅकवेल: शीळ धरणावरील जुनी जॅकवेल पडून विहीर बुजली गेली आहे. ती विहीर पूर्णपणे साफ करून पुन्हा बांधून घेणे आवश्यक असल्याचे सभापती निमेष नायर यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. पानव्हल धरणाचे पाणी सुरू झाल्यानंतर आणि शीळ धरणावरील विहीर कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न बहुतांश सुटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













