राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील रिक्षाचा चक्काचूर; जखमींवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
राजापूर:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकेदायक आणि अपघाती मानल्या जाणाऱ्या वाटूळ येथील तीव्र उतारावर एका अनियंत्रित इनोव्हा कारने प्रवासी रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन निष्पाप बालकांसह एकूण पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
नक्की कसा घडला अपघात?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणारी रिक्षा वाटूळ उतारावरून जात असताना पाठीमागून अत्यंत वेगात आलेल्या एका इनोव्हा कारने (क्रमांक MP 41 ZA 0755) रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षा महामार्गावर पलटी होऊन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अपघाताग्रस्त रिक्षा ही राजापूर तालुक्यातील गोठणेदोनिवडे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवले
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले.
अपघातात दोन लहान मुलांसह सर्वच ५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, सर्वांचीच प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील सखोल आणि तातडीच्या उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत
वाटूळ उतारावरील या थरारक अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. राजापूर पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत व सुरळीत केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.













