सांस्कृतिक यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांचे दमदार सादरीकरण; रत्नागिरीत आनंदाचे वातावरण
रत्नागिरी:
मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवात रत्नागिरीच्या नामांकित गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक यशाची परंपरा यशस्वीपणे कायम राखली आहे. महोत्सवातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कव्वाली इव्हेंटमध्ये महाविद्यालयाच्या संघाने कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध सांस्कृतिक स्पर्धांनी रंगलेल्या या व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रभावी दर्शनामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
संगीत, गायन आणि सांघिक समन्वयाचा सुरेख मेळ
कव्वाली इव्हेंटमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगीत, गायन, अभिनय आणि उत्तम सांघिक समन्वयाचा सुरेख मेळ घालत उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक कव्वालीच्या शैलीला आधुनिक सर्जनशीलतेची जोड देत त्यांनी आपले सादरीकरण सादर केले. हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे, उच्च कलात्मकतेचे आणि सांघिक प्रयत्नांचे फलित ठरले आहे.

या यशस्वी कव्वाली संघात अक्षय शेलटे, आर्या सप्रे, श्रेया सावंत, तन्वी कळंबटे, दिव्यांगिनी पोतदार, कनिष्क जाधव, संतोषी दमाई, सार्थक चव्हाण आणि वेदांगी चक्रदेव या प्रतिभावान विद्यार्थ्यांचा समावेश होता.
मार्गदर्शक आणि संयोजकांचे योगदान
कव्वाली इव्हेंटचे कल्पक दिग्दर्शन गौरव बंडबे यांनी केले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरणाला प्रभावी रूप मिळाले. तसेच कश्मिरा सावंत यांचे बी.पी.ए. (BPA) च्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत संघ व्यवस्थापक प्रा. तन्वी कांबळे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर हे संपूर्ण प्रवासात मुंबई येथे उपस्थित होते.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत असते. यंदाचे कांस्यपदक महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या या यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.













