Lanza Mumbai Goa Highway Auto Rickshaw Accident: लांजानजीक धनावडे फार्मजवळ भीषण अपघात; देवधे गावच्या उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू

Lanza Mumbai Goa Highway Auto Rickshaw Accident: लांजानजीक धनावडे फार्मजवळ भीषण अपघात; देवधे गावच्या उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू

रस्त्यावरील कुत्र्याला वाचवताना रिक्षा पलटी; संजय मणचेकर यांचे उपचारादरम्यान निधन

लांजा (रत्नागिरी):
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा तालुक्यातील धनावडे फार्मजवळ आज दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात देवधे गावचे विद्यमान उपसरपंच संजय नारायण मणचेकर (वय ४२) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षा अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने हा प्राणघातक अपघात घडला. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या संजय मणचेकर यांच्या अशा अकाली निधनामुळे संपूर्ण लांजा तालुका आणि देवधे गावावर शोककळा पसरली आहे.

दुपारच्या जेवणासाठी घरी जाताना काळाचा घाला
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संजय मणचेकर हे व्यवसायाने रिक्षाचालक होते. आज दुपारी ते लांजा शहरातून आपल्या दैनंदिन कामावरून घरी देवधे येथे दुपारच्या जेवणासाठी रिक्षा घेऊन निघाले होते. त्यांची रिक्षा मुंबई-गोवा महामार्गावरील धनावडे शेती फार्म परिसरात आली असता, अचानक एक भटके कुत्रे रिक्षासमोर आले. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात संजय यांनी वाहनावरील ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र वेगात असलेली रिक्षा अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
अपघाताची माहिती मिळताच त्यांचे चुलतभाऊ प्रकाश जानू मणचेकर यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने लांजा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Tata aeris

कार्यक्षम लोकप्रतिनिधी गमावल्याने परिसरात हळहळ
संजय मणचेकर हे देवधे गावच्या विकासात नेहमी अग्रेसर असणारे एक अत्यंत कार्यक्षम, अभ्यासू आणि मनमिळाऊ लोकप्रतिनिधी म्हणून सुपरिचित होते. गावच्या ग्रामपंचायत कारभारात आणि सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या या अकाली आणि दुर्दैवी जाण्याने देवधे गावाने एक उमदा व तत्पर लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.