इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा आणि धोका निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स ते कर्ला जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने अनधिकृतपणे टँकर उभा केल्याप्रकरणी टँकर चालकाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कायदेशीर कारवाई सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:१० वाजता करण्यात आली.
रोहित बालमुकुंद पांडे (वय २७, रा. शेट्येनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टँकर चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश भुजबळराव यांनी फिर्याद दिली आहे.
रस्त्याच्या उत्तरात धोकादायक रितीने उभा केला टँकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चालक रोहित पांडे याने आपल्या ताब्यातील टँकर (क्रमांक MH-०८-बीसी-९००५) हा लाला कॉम्प्लेक्स ते कर्ला जाणाऱ्या मार्गावरील निवखोल येथील उतारात इतर वाहनांच्या सुरळीत वाहतुकीला मोठा अडथळा व धोका निर्माण होईल अशा बेजबाबदार पद्धतीने उभा केला होता. रहदारीच्या रस्त्यावर अशा प्रकारे अवजड वाहन धोकादायकरित्या लावून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संशयित चालक रोहित पांडे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात असून, शहरात बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.













